रत्नागिरी :
शहरातील मांडवी येथे वकिलाला तिघा अज्ञातांकडून बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास घडली. कल्पेश रवींद्र जाधव (२६, रा. नाखरे, रत्नागिरी) असे मारहाण करण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे. जाधव यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, शहर पोलिसांनी तिघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पेश जाधव हे १० फेब्रुवारी रोजी शहरातील मांडवी येथे फिरण्यासाठी गेले होते.रात्री ११.३०च्या सुमारास कल्पेश हे मांडवी समुद्रकिनारी दुचाकीवर बसून गाणी ऐकत होते. यावेळी एक अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला तसेच गांजा आहे का, अशी विचारणा करु लागला. यावेळी आपण वकील असून आपल्याकडे गांजा नाही, असे कल्पेश यांनी सांगितले.
यानंतर त्या इसमाने कल्पेश जाधवना मारहाण केली. तसेच अन्य दोघे इसम पुढे येत त्यांनीही कल्पेश जाधव यांना मारहाण केली. या प्रकरणी जाधव यांनी रत्नागिरी शहर पोलिसात तक्रार दाखल केली.








