इचलकरंजी :
थकित कर्जापोटी बँकेकडून होणारी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी येथील इंडियन बँकेच्या कायदा सल्लागार पॅनलवरील अॅड. विजय तुकाराम पाटणकर (रा. इचलकरंजी) याला 1 लाख 80 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. मंगळवारी रात्री सीबीआय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. येथील बंगला रोडवरील त्याच्या कार्यालयात झालेल्या या कारवाईने इचलकरंजीसह जिह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदाराने इंडियन बँकेच्या इचलकरंजी शाखेतून कर्ज घेतले होते. सुमारे 5.50 कोटींचे कर्ज थकीत राहिल्याने बँकेने जप्तीची नोटीस तक्रारदारास पाठवली होती. तक्रारदाराच्या घरात मंगलकार्य असल्याने जप्तीची कारवाई काही काळासाठी पुढे ढकलावी, अशी विनंती त्यांनी बँकेच्या कायदा सल्लागार अॅड. पाटणकर यांच्याकडे केली. मात्र जप्ती पुढे ढकलण्यासाठी पाटणकर यांनी अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. अखेर 1 लाख 80 हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली.
तक्रारदाराने या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. राष्ट्रीयकृत बँकेच्या कायदा सल्लागाराविरोधात तक्रार असल्याने पुण्यातील सीबीआय अधिकाऱ्यांना याबाबत कळविण्यात आले. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मंगळवारी रात्री पाटणकर याच्यावर सापळा रचण्यात आला. लाचेची रक्कम स्वीकारताना संबंधितास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई सीबीआयचे अधिकारी दीपककुमार आणि त्यांच्या पथकाने केली.
दरम्यान, बुधवारी अॅड. पाटणकर यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सीबीआयचे विशेष सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांनी आरोपीच्या आवाजाचे नमुने आणि सीडी तयार करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. तर आरोपींच्या वकिलांनी ते पब्लिक सर्व्हंट नसल्याने त्यांच्यावर लाचखोरीचा कायदा लागू होत नाही. तसेच फिर्यादीनेच भावनेच्या भरात त्यांना गुंतवले असल्याचा युक्तीवाद मांडला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने अॅड. पाटणकर यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
बँकेच्या कायदा सल्लागारावर पहिलीच कारवाई
बँकेच्या कायदा सल्लागारावर अशी कारवाई होण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याचे समजते. राष्ट्रीयकृत बँकेच्या वकिलाने मोठी रक्कम लाच म्हणून स्वीकारल्याने जिह्यात आश्चर्य व्यक्त होत आहे. अॅड. पाटणकर सध्या सीबीआयच्या अटकेत असून, त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
सीबीआयची पहिली कारवाई
राष्ट्रीयकृत बँकेच्या प्रकरणात सीबीआयकडून इचलकरंजी येथे झालेली ही पहिली कारवाई असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआयकडून होणार असून बँकिंग क्षेत्रातील लाचखोरीचे गंभीर स्वरूप समोर येत आहे.








