प्रतिनिधी,कोल्हापूर
Vomit of Whale Fish : आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारा वकील आणि कोल्हापुरातील उद्योजकास स्थानिक गुन्हे अन्वेषणने जेरबंद केले. वकील माधव विलास सुर्यवंशी (वय 38 रा. बेडकीहाळ ता. निपाणी, बेळगांव), व्यावसायिक अविनाश सुभाष खाबडे (वय 32 रा. लिशा हॉटेल जवळ) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांकडून 1 कोटी 80 लाख रुपये किमतीची 1 किलो 800 ग्रॅम वजनाची उलटी जप्त केली. दसरा चौक येथील मैदानात सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर येथील दसरा चौकामध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करुन विक्री केली जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना मिळाली होती. यानुसार सोमवारी दुपारी या परिसरात वनविभागाच्या मदतीने सापळा रचण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास दोघे जण संशयीतरित्या या परिसरात फिरताना आढळून आले. या दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली असता माधव सुर्यवंशी, अविनाश खाबडे असल्याची सांगितले. या दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे प्रतिबंधीत व्हेल माशाची उलटी मिळून आली. या दोघांनाही ताब्यात घेवून मुख्यालयात नेण्यात आले.
पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, विनायक सपाटे, प्रकाश पाटील, हरीष पाटील, राजेश राठोड, शिवानंद मठपती, संजय पडवळ, संतोष पाटील, रफिक आवळकर, वनअधिकारी रमेश कांबळे वनपाल विजय पाटील यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.
कर्नाटकातून उलटीची तस्करी
माधव सुर्यवंशी, अविनाश खाबडे हे दोघे गिऱ्हाईकाच्या शोधात व्हेल माशाची उलटी घेवून थांबले होते. याचवेळी त्यांना पोलिसांनी जेरबंद केले. एका मध्यस्थाला भेटण्यासाठी ते दसरा चौक परिसरात आले होते. याचवेळी ही कारवाई करण्यात आली. या दोघांना ताब्यात घेवून चौकशी केली असता कर्नाटक येथील हुबळी, धारवाड परिसरातून ही उलटीची तस्करी केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणातील मध्यस्थी असणाऱ्या एकाचा शोधही सुरु असून लवकरच त्याला जेरबंद करण्यात येणार आहे.
उंची अत्तरासाठी वापर
व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठी किंमत आहे. उच्च प्रतीचे अत्तर, सेंट तयार करण्यासाठी या व्हेल माशाच्या उलटीचा वापर केला जातो. या उलटीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
Previous Articleकाणकोण भीषण अपघातात शिवोलीचा वाहतूक पोलीस ठार
Next Article विकासाला ‘खो’ घालणाऱ्यांना बळी पडू नका









