टोळीत 700 हून अधिक शूटर्स : डी-कंपनीप्रमाणेच उद्देश : एनआयएचा मोठा खुलासा
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बराड यांच्या टोळीविरोधात एनआयए सातत्याने कारवाई करत आहे. याचनुसार एनआयएने एक आरोपपत्र दाखल केले असून यात लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीची तुलना दाऊद इब्राहिमशी करण्यात आली आहे. एनआयएने कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, कॅनडा आणि भारतात वाँटेड असलेला गोल्डी बराड समवेत अनेक कुख्यात गँगस्टर्सच्या विरोधात आरोपपत्र दाखल करत मोठा खुलासा केला आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचे दहशतीचे सिंडिकेट अभूतपूर्व पद्धतीने फैलावलेले आहे. 90 च्या दशकात दाऊद इब्राहिमने छोटे-मोठे गुन्हे करत स्वत:चे गुन्हेगारीचे नेटवर्क उभे केले होते. त्याचप्रकारे लॉरेन्सची टोळी काम करत असल्याचे एनआयएच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. दाऊद इब्राहिमने अमली पदार्थांची तस्करी, टार्गेट किलिंग, खंडणीवसुली करत स्वत:ची डी कंपनी निर्माण केली होती आणि त्यानंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांशी संगनमत करत स्वत:चे नेटवर्क फैलावले होते. दाऊद अन् डी कंपनीप्रमाणे बिश्नोई गँगने छोट्या-मोठ्या गुन्ह्यांपासून स्वत:ची सुरुवात केली. मग स्वत:ची टोळी उभी केली आहे. उत्तर भारतात बिश्नोई गँगच्या अनेक ठिकाणी कारवाया सुरू आहेत. कॅनडा पोलीस आणि भारतात वाँटेड असलेला सतविंदर सिंह उर्फ गोल्डी बराडद्वारे बिश्नोई गँग चालविली जात आहे. बिश्नोई गँगमध्ये 700 हून अधिक शुटर्स असून यातील 300 पंजाबशी संबंधित आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूबद्वारे बिश्नोई आणि गोल्डी बराडची छायाचित्रे प्रसारित करण्यात आली. बिश्नोईला न्यायालयात आणताना-नेतानाचे छायाचित्र अपलोड करत गँगचा प्रचार-प्रसार करण्यात आल्याचे समोर आले. बिश्नोई गँगने 2020-21 पर्यंत खंडणीवसुलीद्वारे कोट्यावधी रुपये कमाविले असून तो पैसा हवालाद्वारे विदेशात पाठविण्यात आला आहे.
अनेक राज्यांमध्ये गुन्हेगारी कारवाया
एनआयएनुसार बिश्नोई गँग एकेकाळी केवळ पंजाबपुरती मर्यादित होती. परंतु बिश्नोईने गोल्डी बराडसोबत मिळून हरियाणा, दिल्ली, राजस्थानातील गँगशी हातमिळवणी करत मोठी गँग निर्माण केली. बिश्नोई गँग आता पूर्ण उत्तर भारतात, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, झारखंडमध्ये फैलावलेली आहे. सोशल मीडिया तसेच अन्य मार्गांद्वारे तरुणांना टोळीत सामील केले जात आहे.
विदेशात जाण्याचे आमिष
युवकांना कॅनडा किंवा हव्या त्या देशात वास्तव्य करू देण्याची संधी मिळवून देण्याचे आमिष दाखवत टोळीत दाखल करवून घेतले जाते. एनआयएनुसार पाकिस्तानातील खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंदा हा बिश्नोई टोळीच्या शुटर्सचा वापर पंजाबमध्ये टार्गेट किलिंग आणि गुन्हेगारी कारवाया घडवून आणण्यासाठी करतो. युएपीए अंतर्गत न्यायालयात एनआयएने लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बराड समवेत एकूण 16 गँगस्टर्स विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.









