महिनाभर प्रशिक्षण कार्यक्रम : जबाबदार नागरिक घडविण्याचे उद्दिष्ट
बेळगाव : बेळगाव शहरातील वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस दलाच्या कामकाजाची माहिती करून देण्यासाठी गुरुवारी पोलीस आयुक्त कार्यालयात नव्या उपक्रमाला चालना देण्यात आली. शहरातील पाच पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रातील 50 विद्यार्थ्यांना पुढील महिनाभर पोलीस दलाच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यात येणार आहे. गुरुवारी पोलीस आयुक्त कार्यालयात आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्यासह शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकांतील अधिकारी उपस्थित होते. 30 दिवसांसाठीचा हा कार्यक्रम आहे. यामध्ये 15 दिवस विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान व पोलीस स्थानकातील रोजचे कामकाज याविषयीचे प्रायोगिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
पाच दिवस वेगवेगळ्या पोलीस स्थानकांना भेटी देऊन त्यानंतर सीसीआरबी, पोलीस कंट्रोल रुम, टीएमसी आदी विभागांतील कामकाजाचीही माहिती देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना महिनाभरात काय शिकायला मिळाले, याचा अहवाल शेवटी सादर करायचा आहे. टिळकवाडी, कॅम्प, खडेबाजार, शहापूर व माळमारुती या पाच पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रातील 50 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. गुरुवारी राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या एनएसएस विभागाच्या नोडल अधिकारी कमलाक्षी यांच्यासह आरपीडी, आरएलएस, जीएसएस, सरकारी बीएड् व मिरजी कॉलेजमधील 65 हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. पोलीस आयुक्तांनी या नव्या उपक्रमाविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांना पोलीस दलाच्या कामकाजाविषयी माहिती देण्याबरोबरच त्यांना उत्तम नागरिक बनविणे, अंमलीपदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवणे हाही यामागचा उद्देश आहे. याबरोबरच महिला व मुलांसंबंधीचे कायदे, सायबर गुन्हेगारी याविषयीही प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे.









