कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सातारा तीन जिल्ह्यात 8 विधी (लॉ) कॉलेज आहेत. या कॉलेज अंतर्गत जवळपास दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना पाच वर्षानंतर बी. एस. एल. एल. बी. पदवी दिली जायची. 2024-2025मध्ये लॉची अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता बी. ए. एल. एल. बी पदवी दिली जाणार आहे. तसेच सम–विषम नियमानुसार पहिल्या सेमिस्टरला हजेरीविना परीक्षा देता आली नाही. परंतू दुसऱ्या सेमिस्टरला 75 टक्के हजेरी पूर्ण केली तर दुसऱ्या सेमिस्टरची परीक्षा देता येणार आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
देशभरातील विद्यापीठांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार बी. ए. एल. एल. बी. पदवी दिली जात होती. परंतू शिवाजी विद्यापीठात आत्तापर्यंत बी. एस. एल. एल. बी. ही पदवी दिली जात होती. त्यामुळे भारतीय विद्यार्थी मोर्चाने कुलगुरूंना निवेदन देवून बी. एस. एल. एल. बी. ही पदवी न देता बी. ए. एल. एल. बी पदवी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार कुलगुरू डॉ. शिर्के यांनी अधिकार मंडळाच्या बैठका घेवून बी. ए. एल. एल. बी पदवी देण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांसह विद्यापीठ अंतर्गत आठ महाविद्यालय प्रशासनाने विद्यापीठाच्या या निर्णयाचे स्वागत केले. तसेच शिवाजी विद्यापीठ अंतर्गत विधी (लॉ) कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वर्षाला दोन सेमिस्टर असतात. सम–विषमप्रमाणे पहिल्या सत्रात 75 टक्के हजेरी पूर्ण नसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला देता येत नाही. दुसऱ्या सेमिस्टरला 75 टक्के हजेरी पूर्ण केली तर दुसऱ्या सेमिस्टरची परीक्षा देता येणार आहे. पहिल्या सेमिस्टरची हजेरी दुसऱ्या वर्षात पूर्ण करून पहिल्या सेमिस्टरची परीक्षा देण्याची सुविधा दिली आहे. पुर्वी वर्ष वाया जात होते. आता या निर्णयानुसार सहा महिन्यात परीक्षा देता येणार आहे. हा निर्णय फक्त विधी (लॉ) कॉलेजसाठी घेतला आहे. इतर अभ्यासक्रमाला ही सुविधा दिली जाणार नाही, अशी माहिती देण्यात आली.
- बार कौन्सिलच्या निर्णयानुसार योग्य निर्णय
युजीसी आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आठ कॉलेजमधील विद्यार्थ्यांना बी. ए. एल. एल. बी पदवी दिली जाणार आहे. या निर्णयानुसार एकाचवेळी विद्यार्थ्यांना बी. ए. आणि एल. एल. बी.ची पदवी मिळणार. हा निर्णय बार कौन्सिलच्या नियमानुसार विद्यार्थी हिताचा आहे.
- मराठीतून एलएलबी करणाऱ्यांना कोर्टात अडचणी
लॉ कॉलेजमध्ये संपूर्ण अध्यापन इंग्रजीमध्ये केले जाते. परंतू अलीकडे विद्यार्थ्यांना मराठीतून परीक्षेचे पेपर लिहण्याची परवानगी दिल्याने 70 टक्के इंग्रजी व 30 टक्के मराठीतून अध्यापन करावे लागते. मराठीमध्ये नोटस उपलब्ध असल्या तरी त्या दर्जेदार नाहीत. त्यामुळे मराठीतून परीक्षा देणाऱ्यांना पुढे जावून वकीली करताना न्यायालयाचे संपूर्ण कामकाज इंग्रजीमधून असल्याने मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
- शिवाजी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांची संख्या
कोल्हापूर-2, सांगली-2, कराड-1, फलटण-1, सातारा-1, विटा-1
युजीसी आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार बीएएलएलबी पदवी देणे बरोबर आहे. कारण विद्यार्थ्यांना एकाचवेळी बीएएलएलबी दोन पदव्या मिळणार आहेत.
डॉ. प्रविण पाटील (प्राचार्य शहाजी लॉ कॉलेज)








