कराड :
पाच दिवसांवर आलेल्या रंगपंचमीत हुल्लडबाजी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. रंगपंचमीच्या काळात हुल्लडबाजी करत अनेक युवक मद्यधुंद अवस्थेत आरडाओरडा करत डीजेचा आवाज वाढवून दंगा करत असतात. या हुल्लडबाजांना कायद्याचा ‘रंग’ दाखवण्यासाठी पोलीस प्रशासनाने व्यूहरचना आखली आहे. पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक, गुन्हे प्रकटीकरण शाखेसह चार स्वतंत्र पथके वेगवेगळ्या भागात नजर ठेवून असणार आहेत. हुल्लडबाजांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी या माध्यमातून दिला आहे.
रंगपंचमीच्या सणाचा उत्साह आतापासूनच दुणावला आहे. रंगपंचमीला कराड शहर व परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय वेगवेगळ्या ग्रुपच्या वतीने रंगपंचमी दिवशी डीजे लावून दिवसभर रंगपंचमी खेळण्यात येणार आहे. याच काळात काही रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह अनेकजण रस्त्यांवरून वेगाने वाहने चालवत हुल्लडबाजी करत असतात. या पार्श्वभूमीवर पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी पोलिसांना अलर्ट केले आहे. कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, कराड ग्रामीणचे महेंद्र जगताप यांच्यासह सर्व दूरक्षेत्राच्या प्रभारी अधिकाऱ्यांना हुल्लडबाजांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. महिला, युवती यांची छेडछाड करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी निर्भया पथकाला तैनात केले आहे. प्रत्येक बाहनधारकाची तपासणी होणार आहे. तर अवैध धंद्यावर छापेमारी केली जाणार आहे.
- तडीपार, रेकॉर्डवरील गुन्हेगारांना दणका
रंगपंचमीत महिला सुरक्षेला प्राधान्य दिले असून निर्भया पथक तैनात केले आहे. शिवाय शुक्रवारपासूनच पोलीस उपअधीक्षक कार्यालयात रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह ज्यांचे तडीपारीचे प्रस्ताव आहेत त्यांना बोलवून त्यांची झाडाझडती घेतली जात आहे. शुक्रवारी अनेक संशयित गुन्हेगारांसह जामिनावर सुटलेल्यांना टप्याने पोलीस उपअधीक्षक कार्यालयात ात बसवून ठेवत उपअधीक्षक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमित बाबर यांच्यासह पोलीस कर्मचारी त्यांच्याकडे कसून चौकशी करत होते. रंगपंचमी होईपर्यंत सर्व गुन्हेगारांची झाडाझडती घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.








