राज्यभर नाराजीचा सूर : भाजपचे ॲड. जिरली यांचा आरोप
बेळगाव : काँग्रेस आमदारांकडून राज्य सरकारवर ताशेरे ओढण्यात आल्याने उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आमदारांना 50 कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले. त्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केवळ काँग्रेस आमदारांना हा निधी दिला जाईल, असे स्पष्ट केले. हा प्रकार म्हणजे विरोधी पक्षातील आमदारांना डावलण्यासारखा आहे. राज्य सरकारने संविधानविरोधी भूमिका घेतली असल्याने राज्यभर नाराजीचा सूर उमटत असल्याचा आरोप भाजपचे नेते ॲड. एम. बी. जिरली यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला. कलबुर्गी येथे जिल्ह्याचा स्वतंत्र कारभार चालवला जात आहे.
मंत्री प्रियांक खर्गे यांचा अंदाधुंद कारभार सुरू असल्याने ड्रगमाफिया सक्रिय झाल्याचे त्यांनी सांगितले. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या (आरसीबी) विजयानंतर बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित सत्कार समारंभात अकरा जणांना चेंगराचेंगरीमुळे जीव गमवावा लागला. या प्रकरणी आरसीबी व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु, त्याला राज्य सरकारही तितकेच जबाबदार आहे. त्यामुळे या प्रकरणातून राज्य सरकार आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ॲड. जिरली यांनी केला. यावेळी भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष गीता सुतार, जिल्हा सरचटणीस मल्लिकार्जुन, संदीप देशपांडे, राजशेखर डोणी, सचिन काडी यासह इतर उपस्थित होते.









