माजी आमदार पी. राजीव यांचा आरोप : गुलबर्गा घटनेवरून सरकारला घेरले, आज ‘चलो गुलबर्गा’चा नारा
बेळगाव : राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. गुलबर्गा येथे भाजपचे विधानपरिषद सदस्य चलवादी नारायणस्वामी यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला. पोलिसांसमोरच हा हल्ला झाला. परंतु त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. राज्यात इतर ठिकाणीही अशाच घटना घडत आहेत. या विरोधात शनिवार दि. 24 रोजी ‘चलो गुलबर्गा’ असा नारा देण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे राज्य सरचिटणीस व माजी आमदार पी. राजीव यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाच्या सदस्यांना महत्त्वाचे स्थान असते. परंतु राज्यातील काँग्रेस सरकारने विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरच हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षाची कोणतीही बाजू विचारात घेतली जात नाही. गुलबर्गा येथे इतकी मोठी घटना घडून देखील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतलेली नाही, हे राज्यातील गृहविभागाचे अपयश आहे. जर लोकप्रतिनिधींचे संरक्षण करू शकत नसेल तर गृहविभाग राज्यातील जनतेचे काय संरक्षण कारणार? असा प्रश्न पी. राजीव यांनी उपस्थित केला.
जेनेरीक मेडिसीनमुळे सर्वसामान्यांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध होतात. परंतु कर्नाटक सरकारमधील मंत्री दिनेश गुंडुराव यांनी जेनेरीक मेडिसीन न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोठ्या औषध कंपन्यांसोबत राज्य सरकारचे काही हितसंबंध आहेत का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, रमेश देशपांडे, हनमंत कोंगाली, राजशेखर डोनी यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.









