प्रतिनिधी/ फोंडा
फोंडा मतदारसंघाचे माजी आमदार लवू मामलेदार यांचे पार्थिव शनिवारी रात्री फोंड्यात पोहचले. आज रविवार दि. 16 रोजी सकाळी दुर्गाभाट-फोंडा येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनाला ठेवल्यानंतर दुपारी 12.30 वा. फोंडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. शनिवारी दुपारी बेळगाव येथे एका रिक्षाचालकाने क्षुल्लक कारणावऊन त्यांना मारहाण केल्याच्या घटनेनंतर काही वेळातच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला होता.
शनिवारी दुपारी लवू मामलेदार यांच्या निधनाची वार्ता विविध माध्यमातून सर्वत्र पसरल्यानंतर त्यावर उलटसुलट चर्चा सुऊ झाल्या. व्हायरल झालेली घटनास्थळावरील दृष्ये पाहून अनेकांनी संताप व हळहळही व्यक्त केली. त्यांच्या निधनामुळे फोंड्यात शोककळा पसरली आहे. लवू मामलेदार यांनी वर्ष 2007 मध्ये पोलीस खात्यातून उपअधीक्षकपदाचा राजीनामा देत राजकारणात प्रवेश केला होता. त्याचवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मगो पक्षातर्फे फोंडा मतदारसंघातून उमेदवारी केली होती. अवघ्या काही मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र वर्ष 2012 साली झालेल्या निवडणुकीत मगो-भाजपा युतीचे उमेदवार म्हणून ते विजयी होऊन आमदार बनले. आमदारकीच्या कार्यकाळात हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष तसेच राजीव गांधी कलामंदिरचे अध्यक्षपद त्यांच्याकडे होते. वर्ष 2017 च्या निवडणुकीत मगो-भाजपाची युती तुटल्याने त्यांनी मगोतर्फे पुन्हा उमेदवारी केली. पण त्यात यश आले नाही. तेव्हापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची उतरण सुऊ झाली. राजकीय डावपेचापेक्षा त्यांचे राजकारण सरळमार्गी होते. त्यांचा थेट व स्पष्टवक्तेपणाचा स्वभाव राजकीय भवितव्यासाठी अडचणीचा ठरला. मगो पक्षाशी झालेल्या मतभेदानंतर राजकारणात ते मागे पडत गेले. मध्यंतरी काहीकाळ तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच ते या पक्षातूही बाहेर पडले. वर्ष 2022 च्या निवडणुकीत मडकई मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे एकेकाळचे घनिष्ठ मित्र मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याचा असफल प्रयत्न त्यांनी केला. मात्र त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पुन्हा उभारी आली नाही. पोलीस खात्यातील मोठ्या हुद्द्यावरील पदाचा त्याग कऊन राजकारणात येण्याची रिस्क लवू मामलेदार यांनी घेतले खरी, पण आमदारकीचा पाच वर्षांचा एकच कार्यकाळ सोडल्यास पुढे त्यांना स्थिरता लाभली नाही.
शालेय जीवनापासूनचे मित्र : सुदिन ढवळीकर
दरम्यान, त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल राजकीय तसेच अन्य विविध क्षेत्रातील मान्यवर व चाहत्यांनी दु:ख व्यक्त केले आहेत. वीजमंत्री तथा मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी त्यांच्याविषयी भावना व्यक्त करताना लवू मामलेदार हे आपले शालेय जीवनातील मित्र होते. हायस्कूलपासून कॉलेजपर्यंत आम्ही एकत्र शिकलो. चांगल्या मित्रत्वाचे नाते आमच्यात निर्माण झाले होते. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो एवढे आज म्हणता येईल.
त्यांची पोलीस कारकीर्द उत्कृष्ट होती : रवी नाईक
कृषिमंत्री रवी नाईक म्हणाले, लवू मामलेदार हे पोलीस अधिकारी म्हणून उत्कृष्ट होते. सर्वांशी ते मिळून मिसळून वागत. त्यांच्या निधनाबद्दल दु:ख वाटते. त्यांच्या कुटुंबियांवर झालेला आघात पचविण्याची परमेश्वर शक्ती देवो.
मतभेद असले तरी मैत्रीत अंतर नव्हते : भाटीकर
लवू मामलेदार यांच्या निधनाची बातमी कळताच मगो नेते डॉ. केतन भाटीकर अन्य काही निकटवर्तीयांसह बेळगावला धावले. तेथे सर्व सोपस्कार पूर्ण कऊन मृतदेह फोंड्यात आणेपर्यंत ते सोबत होते. लवू मामलेदार हे एक प्रामाणिक व्यक्ती होते. आमच्यात कितीही राजकीय मतभेद असले तरी मैत्रीमध्ये कधीच अंतर पडले नाही. आपल्या वाढदिवसाला न चुकता ते शुभेच्छा देत. एक चांगली व्यक्ती अकाली गेल्याचे दु:ख होत असल्याची भावना भाटीकर यांनी व्यक्त केली









