14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून होणार प्रक्षेपण
► वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) मंगळवारी चांद्रयान-3 साठी ‘लाँच रिहर्सल’ (प्रक्षेपणाची रंगीत तालीम) पूर्ण केली आहे. चांद्रयान-3 मोहिमेला 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
चांद्रयान-3 मिशनच्या लाँच रिहर्सलची तयारी आणि 24 तासांपर्यंत चालणाऱ्या प्रक्रियेला पूर्ण करण्यात आल्याचे इस्रोकडून ट्विट करत सांगण्यात आले. लाँच रिहर्सलमध्ये प्रक्षेपण केंद्रापासून अन्य स्थानांमधील सर्व केंद्रे, टेलिमेट्री सेंटर आणि कम्युनिकेशन युनिट्सच्या तयारींचा आढावा घेतला जातो. यावेळी प्रक्षेपणासारखीच स्थिती असते, केवळ रॉकेट प्रक्षेपित केला जात नाही. इस्रोने 5 जुलै रोजी सतीश धवन अंतराळ केंद्रात लाँच व्हेईकल एलव्हीएम 3 सोबत चांद्रयान-3 युक्त एनकॅप्सुलेटेड असेंबलीला एकीकृत केले होते.
चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यास आम्ही यशस्वी ठरू असे उद्गार इस्रो प्रमुख सोमनाथ यांनी यापूर्वी काढले आहेत. चांद्रयान-2 मधील बिघाडामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्यास मागील मोहिमेत अपयश आले होते. अशा स्थितीत इस्रोच्या वैज्ञानिकांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.









