प्रतिनिधी/ बेळगाव
‘माझे जीवन स्वच्छ शहर अभियाना’ला शनिवारपासून प्रारंभ करण्यात आला. केंद्रिय गृह आणि नगरविकास खात्याने सुरू केलेल्या स्वच्छ भारत मिशन शहर अंतर्गत 5 जूनपर्यंत नको असलेल्या परंतु पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तुंचे संकलन करण्यात येणार आहे. शनिवारी महापौर शोभा सोमनाचे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
नागरिकांनी प्लास्टीकच्या वस्तु, जुनी पुस्तके, जुने कपडे, पादत्राणे यासह अन्य वस्तु द्याव्यात, अशी अपेक्षा आहे. या वस्तु संकलन करण्यासाठी महानगरपालिकेने 12 ठिकाणी संकलन केंद्रांची स्थापना केली आहे. भाग्यनगर येथील धनश्री गार्डन, उद्यमबाग येथील सुका कचरा संकलन केंद्र, शहापूर येथील सफाई कामगार वसाहत, खासबाग येथील नाईट शेल्टर गोदाम, कपिलेश्वर रोडवरील बीट कार्यालय, कांदा मार्केट येथील महानगरपालिकेची इमारत, भडकल गल्ली येथील सेंट्रल लायब्ररी जवळ, सरदार्स मैदान व अशोकनगर येथील स्पोर्टस् कॉम्प्लेक्स या ठिकाणी नागरिकांना या वस्तू देता येतील.
या संकलनाची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांवर सोपविण्यात आली आहे. पुन्हा वापर करता येणाऱ्या वस्तु गरजुंना देणे किंवा त्यापासून टिकावू अशा वस्तु तयार करणे हा अभियानाचा हेतू आहे. या अभियानामध्ये महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, रहिवासी संघटना सदस्या यांनाही सहभागी करुन घेण्यात आले आहे.









