अवकाशयान 21 किंवा 22 रोजी चंद्रावर उतरण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाने शुक्रवारी चांद्रमोहीम ‘लुना-25’चे प्रक्षेपण केले आहे. हे अवकाशयान 21 किंवा 22 ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचेल अशी अपेक्षा आहे. तब्बल 47 वर्षांनंतर आपले वाहन रशियाने पाठवले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) या चांद्रयान मोहिमेसाठी रशियन अंतराळ संस्थेचे अभिनंदन केले. चांद्रयान-3 आणि लुना-25 या दोन्ही मोहिमांनी आपले उद्दिष्ट साध्य करावे, असे ट्विट इस्रोने केले आहे.
भारताच्या चांद्रयान-3 सोबतच आता रशियाही चंद्रावर उतरण्याच्या तयारीत आहे. रशियाने 11 ऑगस्ट रोजी ‘मिशन लुना-25’चे प्रक्षेपण यशस्वीपणे केले आहे. यापूर्वी 1976 मध्ये त्यांना ‘मिशन लुना-24’ चंद्रावर उतरवले होते. भारताने 14 जुलै रोजी चांद्रयान-3चे यशस्वी प्रक्षेपण केले होते. भारताचे हे अवकाशयान 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल. पण, त्यापूर्वी रशियाचे लुना-25 चंद्रावर उतरू शकते.
रशियाने व्होस्टोचनी कॉस्मोड्रोम येथून लुना-25चे प्रक्षेपण पेले आहे. हे ठिकाण मॉस्कोच्या पूर्वेस सुमारे 5,550 किमी अंतरावर आहे. लुना-25 पाच दिवसात चंद्राच्या कक्षेत पोहोचेल. त्यानंतर ते 7 ते 10 दिवस चंद्राच्या कक्षेत राहिल्यानंतर ते चंद्रावर उतरेल. सोयुझ 2.1बी रॉकेटमधून लुना-25 चंद्रावर पाठवण्यात आले. त्याला लुना-ग्लोब मिशन असे नाव देण्यात आले आहे. रॉकेटची लांबी सुमारे 46.3 मीटर आहे, तर त्याचा व्यास 10.3 मीटर असल्याचे रशियाची अंतराळ संस्था रोसकोसमॉसने म्हटले आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले वाहन उतरवण्याची रशियाची योजना आहे. चंद्राच्या या ध्रुवावर पाणी सापडण्याची शक्मयता आहे. 2018 मध्ये नासाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी असल्याचे सांगितले होते. लुना-25 मध्ये रोव्हर आणि लँडर आहे. त्याचे लँडर सुमारे 800 किलो आहे. लुना-25 सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर ते खडक आणि मातीचे नमुने गोळा करेल. भविष्यात मानवाने चंद्रावर तळ तयार केल्यास तेथे पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, हा रशियाचा उद्देश आहे.









