प्रतिनिधी /म्हापसा
कळंगुट येथील प्रसिद्ध जागृत देव श्री बाबरेश्वराचा जत्रोत्सव 11 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. त्याप्रीत्यर्थ देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिर उभारण्यास हातभार लावण्यासाठी लॉटरी काढण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला असून या लॉटरी कुपनांचा रितसर शुभारंभ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ चानू चोडणकर व ट्रस्टच्या इतर सभासदांच्या हस्ते देवस्थानच्या आवारात करण्यात आला.
यावेळी देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर म्हणाले की मंदिर उभारण्यास काही पैशांचा अभाव भासत असल्याने समितीतर्फे लॉटरी देणगी कुपन करण्याचा निर्णय घेण्यात आला. असून त्याच्या सातव्या दिवशी लॉटरीचा निकाल काढण्यात येणार आहे. देवस्थानला सहकार्य करण्यासाठी प्रत्येकाने देणगी कुपन काढून बांधकामास सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष चोडणकर यांनी केले. 15 हजार लॉटरी काढण्यात आल्या असून बक्षीस स्वरुपात पाच दुचाकी स्कूटर व उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. लॉटरीचा तिकीट दर 100 रुपये आहे.
मंदिर उभारण्यास मदतीची गरज
एकनाथ नागवेकर यांनी सांगितले की देवस्थान उभारण्यासाठी जो एस्टीमेट काढला होता तो आता वाढला आहे. मंदिर पूर्ण करण्यासाठी 60 लाख व अन्य सुशोभिकरण करण्यासाठी कोटी रुपयांची गरज आहे. पुन्हा पुन्हा घरोघरी देणगी मागण्यापेक्षा लॉटरी स्वरुपात लोकांनाही काही देऊया असा समितीने निर्णय घेतला. असे ते म्हणाले.
राजेंद्र कोरगावकर म्हणाले की ही वास्तु दिसून येते त्याचे 80 टक्के काम पूर्ण झालेले आहे. ते पूर्णत्वास येण्यासाठी ट्रस्ट कमिटी जोमाने काम करीत आहे. येणाऱ्या जत्रोत्सवात ही वास्तु पूर्ण होणार आहे, असे ते म्हणाले.
हाकेला धावणारा व नवसाला पावणारा श्री देव बाबरेश्वर
हाकेला धावणारा व नवसाला पावणारा श्री देव बाबरेश्वर असून या जत्रोत्सवात भाविक देवाकडे साकडे घालतात व नवस पूर्ण झाल्यावर देवाला केळीचा घड अर्पण करतात, अशी श्री देव बाबरेश्वराची ख्याती आहे. सात दिवस हा जत्रोत्सव होतो. पहिल्याच दिवशी या ठिकाणी सुमारे 2500 हून अधिक केळीचे घड बांधले जातात. नवस फेडण्यासाठी विदेशातूनही भाविक येतात, अशी माहिती चंद्रकांत चोडणकर यांनी दिली.
कृष्णनाथ कळंगुटकर म्हणाले की देवाची 200 वर्षांची ख्याती होती की इथे पाषाणाचे मंदिर व्हावे जे पूर्णत्वास येत आहे. हे मंदिर उभारण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.









