तीन हजार जणांना लसीकरणाचे उद्दिष्ट : आरोग्य कर्मचारी सक्रिय
बेळगाव ; जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत दुसऱ्या टप्प्यातील इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेला सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. ऑगस्ट महिन्यात पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहीम झाली होती. आता दुसऱ्या टप्प्यात लसीकरणापासून वंचित असणाऱ्या गर्भवती महिला आणि बालकांना लस टोचण्यात आली आहे. गर्भवती महिला आणि बालकांतील आजाराचे प्रमाण कमी व्हावे आणि आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी ही लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. दुसऱ्या टप्प्यात 598 गर्भवती महिला, 0 ते 2 वर्षे वयोगटातील 2676 बालके व 2 ते 5 वर्षे वयोगटातील 95 बालकांना लस दिली जाणार आहे. 16 सप्टेंबरपर्यंत मोहीम चालणार आहे. इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी शाळास्तरावर आणि गावोगावी जनजागृती केली जात आहे. एकही गर्भवती महिला किंवा बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही. याची काळजी घेतली जात आहे. दरम्यान 9 ते 16 ऑक्टोबर या कालावधीत तिसऱ्या टप्प्यात मोहीम राबविली जाणार आहे. वंचित असलेल्यांना व अर्धवट लसीकरण झालेल्यांना या मोहिमेंतर्गत लस दिली जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी दवाखाने, अंगणवाडी केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका कार्य करीत आहेत
अंगणवाडी सेविकांवर जबाबदारी
दुसऱ्या टप्प्यातील इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. तीन हजारहून अधिक गर्भवती महिला आणि बालकांना लस दिली जाणार आहे. आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक, पर्यवेक्षक, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविकांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
-डॉ. शिवानंद मास्तीहोळी (तालुका आरोग्य अधिकारी)









