आर्थिक विकासापेक्षा आरोग्य क्षेत्रात जास्त काम करणे आवश्यक- तहसिलदार अमोल पाठक
वार्ताहर / कुडाळ
देशाचा विकास करायचा असेल तर, त्यातील पायाभूत क्षेत्र म्हणजे आरोग्य असते. कोणत्याही देशाच्या आर्थिक बाबीपेक्षा त्या देशाचा आरोग्य निर्देशांक कशा पद्धतीचा आहे. त्यावर त्या देशाचा निर्देशांक मोजला जातो. आपल्या देशाला महासत्ता बनायचे असेल, तर आर्थिक विकासापेक्षा आरोग्य क्षेत्रात जास्त काम करणे आवश्यक आहे, असे आवाहन कुडाळचे तहसिलदार अमोल पाठक यांनी येथे केले.”आयुष्मान भव” या मोहिमे अंतर्गत साप्ताहिक आरोग्य मेळावा येथील महिला बाल रुग्णालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल पवार, वैद्यकीय अधीक्षक प्रमोद वालावलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची तणपुरे, डॉ. श्री करंबळेकर, वरिष्ठ लिपीक आनंद गायकवाड, कनिष्ठ लीपक विनोद जाधव, अधिपरिचारीका ( महिला रुग्णालय) सौ. गावित, आधि परिचारीका (ग्रामीण रुग्णालय) सौ. कुडासकर, ऋतिका तेली व परिचर, परिचारिका उपस्थित होत्या.
“आयुष्मान भव” मोहिमेचे उदघाटन तहसिलदार अमोल पाठक व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी उपस्थितानी “आयुष्मान भव” योजनेची शपथ घेतली.पाठक म्हणाले, आज आरोग्य अधिकारी, कर्मचारी सेवा पंधरवडा, सेवा सप्ताह या माध्यमातून काम करीत आहे . वैयक्तिक आरोग्य असेल किंवा समाजिक आरोग्य असेल या दोन्ही पातळीवर चांगल्या प्रकारे काम केले पाहिजे. सध्याच्या काळामध्ये येणारा काळ हा आरोग्याच्या दृष्टीने वैद्यकीयरीत्या आव्हानात्मक असणार आहे. 21 व्या शतकातील जीवन हे आरामदायी जीवन म्हटले जाते. परंतू आपले जीवन आरामदायी राहिलेले नाही. आरामदायी जीवनामुळे विविध प्रकारचे रोग तयात होत आहेत. तुमच्या वयाच्या चाळीस – पन्नास वर्षानंतर तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे. तुम्ही किती समृद्ध आहात. यापेक्षा तुमचे वैयक्तीक आरोग्य कसे आहे. त्यावर तुमचे सुख समृद्ध जीवन अवलंबून असते. अशा योजनांच्या माध्यमातून आरोग्याचे महत्व आपल्याला लोकांपर्यत पोहचवायचे आहे, असे त्यांनी सांगितले.
पवार म्हणाले, आयुष्मान भव ही मोहीम 13 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत राबविली जात आहे. आयुष्मान भव मोहीमेअंतर्गत प्रत्येक आठवड्याला रुग्णालयात विशेष तज्ञ मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यास पात्र लाभार्थी असतील त्यांच्यावर या योजनेअंतर्गत उपचार करण्यात येणार आहेत. रुग्णावर मोठी शस्त्रक्रिया करायची झाल्यास जिल्हा रुग्णालयामार्फत केली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून (आबा आयडी) आयुष्यमान कार्ड वितरीत करण्यात येणार आहे. कर्ण दोष, नेत्र दोष असलेल्यारुग्णांना सुवर्ण यंत्र देण्यात येणार आहे. स्वछ भारत अभियान व रुग्ण कल्याण समिती यांना आयुष्यमान भव ही मोहीम राबवायची आहे. रक्तदान शिबीरही घेण्यात येणार आहे. तीन साडेतीन महिन्यात या योजना राबवायच्या आहेत. या योजना वैद्यकीय टीम, जिल्हा शल्य चिकित्सक टीम यांना राबवायच्या आहेत.असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रमोद वालावलकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रुचीता तळेकर यांनी मानले.









