मार्कंडेय साखर कारखान्याच्या संचालकांकडून कंग्राळी बुद्रुक येथील कलमेश्वर मंदिरात पूजन
वार्ताहर /काकती
मार्कंडेय साखर कारखान्याचे मावळते चेअरमन अविनाश पोतदार पॅनेलच्यावतीने संचालक मंडळातील उमेदवारांनी कंग्राळी बी. के. येथील जागृत देवस्थान श्री कलमेश्वर मंदिरात पूजन करून प्रचाराचा शुभारंभ केला. प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी चेअरमन अविनाश पोतदार म्हणाले, मार्कंडेय साखर कारखाना चालू व्हावा. उसाचे गाळप होऊन, साखर पडावी ही माझी जबाबदारी होती. ती मी पूर्ण केली आहे. कारखाना चालविण्यासाठी ठेवी गोळा करून व्याज भरून कारखाना चालविला आहे. आता कोणीही साखर कारखाना चालवावा. कारखान्याचे व्यवस्थित गाळप व्हावे. प्रामुख्याने शेतकऱ्यांना लाभ होऊन त्याचे हित जपावे. या उद्देशाने तालुक्यात या कारखान्याची निर्मिती झाली आहे.
यावर्षी पुन्हा नवीन जबाबदारी आहे. भांडवल असेल तरच कारखाना चालणार आहे. ज्यांना कारखाना चालवायचा असेल त्यांनी चालवावा, माझी हरकत नाही. कोणाबद्दलही वाईट बोलणार नाही. केवळ सत्तेसाठी दिशाभूल अथवा अप्प्रचार करणार नाही. आमचे पंधरा उमेदवारांचे पॅनेल असून आमच्या पॅनेलला मतदान करून निवडून द्यावे. आम्ही निवडून आल्यास जास्तीतजास्त गाळप, साखर व साखरेचा अधिक उतारा कसा होईल तसेच कारखाना कसा फायद्यात चालेल याकरिता इथेनॉल, सहवीज प्रकल्प राबवून शेतकऱ्यांसह तालुक्याचा विकास करणार आहे. संचालक मंडळावर विश्वास ठेवून काहींनी ठेवी ठेवल्या आहेत. त्या परतफेड करणे ही आमची नैतिक जबाबदारी समजतो. तसेच शेतकऱ्यांना वेळेत उसाचे बिल देणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. याकरिता संचालक मंडळाला आर्थिक भांडवल जमवावे लागते, असेही ते म्हणाले. साखर कारखानदारीत पैशावर अधिक व्याज देऊन परवडत नाही. भांडवलांची कमतरता असल्याने मोठ्या भांडवलांची तरतूद करणाऱ्यांना कारखाना काही दिवस लीजवर देण्यास परवडते असा भागधारक व संचालक मंडळाकडे प्रस्ताव ठेवला होता. याचा गैरसमज करून अफवा पसरू नये. हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे, असे प्रांजळ मत पोतदार यांनी व्यक्त केले.









