काँग्रेसचे महापौर चार हात दूर
प्रतिनिधी/लातूर
स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा धागा जोडू चला एकतेचा या संकल्पनेतून काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून निघालेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील तथा मराठवाडय़ातील नांदेड जिह्यातील देगलूर येथे पोहचली. देगलूर हे ठिकाण लातूर जिल्ह्यातील उदगीरपासून काही अंतरावर आहे. याठिकाणी खा. राहुल गांधी यांचे भव्य स्वागत करण्यात आले. परंतु या स्वागत समारंभात लातूर जिल्ह्याला डावलल्याने काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रदेश नेतृत्वाने लातूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला या भारत जोडो यात्रेत समावेश करण्याचे नाकारल्याने हा चर्चेचा विषय झाला.
काल नांदेड येथे खासदार राहुल गांधी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत माजी मंत्री अमित देशमुख यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वानेही लातूरकरांना डावलल्याची चर्चा सुरू असताना विद्यमान महापौरांनी भारत जोडो यात्रेपासून दूर राहणेच पसंत केल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा आहे. काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली भारत जोडो यात्रा ही लातूर जिल्ह्यातील नेतृत्वावर अविश्वास दाखविणारीच आहे. वास्तविक लातूर हा नांदेड जिल्ह्याचा शेजारी जिल्हा आहे. लातूर जिह्यातील उदगीरपासून काही अंतरावर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे या यात्रेचा प्रवेश झाला. परंतु काँग्रेस नेतृत्वाने लातूरकरांना या यात्रेत सुरुवातीपासूनच सहभागी होण्यासाठी नाकारल्याची चर्चा आहे. नांदेड व लातूर हे दोन्ही जिल्हे शेजारी असताना लातूरकरांना हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्मयातील हिवरे, चोरंबा फाटा येथे सहभागी होण्यासाठी पक्ष नेतृत्वाने आदेश दिल्याने लातूरकरांना काल नांदेड येथे झालेल्या खा. राहुल गांधींच्या सभेत सहभागी होता आले नाही. त्यामुळे नांदेडकरांनी लातूरकरांना भारत जोडो यात्रेपासून दूर ठेवल्याची सर्वत्र चर्चा आहे.
याउपरही राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री आ. अमित देशमुख यांच्या पुढाकारातून हिंगोली येथे या यात्रेत सहभागी होण्यासाठी लाखेंच्या संख्येने काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक, महिला, युवती, युवक भारत जोडो यात्रेत सहभागी झाले असले तरी काँग्रेसचे लातूरचे विद्यमान महापौर विक्रांत गोजमगुंडे हे या भारत जोडो यात्रेपासून दूर राहिल्याने उलट-सुलट चर्चा चर्चिली जात आहे.
काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली नांदेड शहरात भारत जोडो यात्रेने प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती असताना लातूर जिह्यातील माजी मंत्री आ. अमित देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख हे मात्र या यात्रेत सहभागी नसल्याने याबाबत लातूर व नांदेडकरांत संभ्रमाचे वातावरण आहे.