विद्यार्थ्यांवरील कारवाईविरोधात भाजपची ‘बंगाल बंद’ची हाक
► वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील आरजी कर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये एका कनिष्ठ महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटनांच्यावतीने मंगळवारी राज्य सचिवालयावर मोर्चा (नबान्ना अभियान) काढण्यात आला. पश्चिम बंगाल छात्र समाज या संघटनेच्या बॅनरखाली ही मोहीम राबवली जात असताना त्यांना रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. आंदोलकांनी हावडा येथील संत्रागाछी येथे पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडले. त्याचवेळी आंदोलकांवर पाण्याचा फवारा मारल्याने आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने जमाव संतप्त झाला. या संघर्षात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांचा मोर्चा चिरडण्याचा प्रयत्न झाल्याच्या कारणावरून भाजपने बुधवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. या बंददरम्यान राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी भाजप खासदारांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन छेडले जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला निषेध मोर्चा रोखण्यासाठी कोलकाता आणि हावडा येथे अभेद्य सुरक्षाकवच सज्ज ठेवण्यात आले होते. हावडा येथील राज्य सचिवालय परिसरात आणि आसपास 6,000 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी सचिवालयाच्या सर्व प्रवेशद्वारांवर आधीच भक्कम बॅरिकेड्स लावले होते. आंदोलक सतत पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस त्यांना रोखत होते. पाण्याच्या जोरदार तोफांचा मारा करूनही मागे ढकलले जात असतानाही आंदोलक पुन्हा उठून पुन्हा निदर्शने करताना दिसत होते. पोलीसही लाठ्या-काठ्या घेऊन आंदोलकांचा पाठलाग करत असल्याने आंदोलनस्थळी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. आंदोलक ममता सरकारच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तर, तृणमूल काँग्रेसचे खासदार सयानी घोष यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला गुंडगिरी संबोधले आहे.
शहराच्या कानाकोपऱ्यात पोलीस
मंगळवारी सचिवालय परिसरात हजारो पोलीस तैनात होते. आयजी आणि डीआयजी दर्जाच्या 21 अधिकाऱ्यांना सुरक्षेची विशेष जबाबदारी देण्यात आली होती. याशिवाय एसपी आणि डीएसपी दर्जाचे 13 अधिकारी, अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक दर्जाचे 15 अधिकारीही तैनात करण्यात आले होते. कोलकाता येथील हावडा ब्रिज सील करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला निषेध मोर्चा बेकायदेशीर असल्याचे सांगत पोलीस प्रशासनाने त्याला परवानगी दिली नव्हती. सकाळपासून ड्रोनद्वारेही संपूर्ण परिसरावर नजर ठेवण्यात येत होती. शहर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
राजकीय आरोप-प्रत्यारोप
निषेध मोर्चामागे मोठे षड्यंत्र असल्याचा दावा तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी केला आहे. यामागे भाजपचा हात असल्याचे ते म्हणाले. सीपीआय-एम आणि काँग्रेसही त्यांना मदत करत असल्याचा दावाही करण्यात आला. दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री आणि बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी ममता सरकार विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला घाबरल्यामुळे ते दडपण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान कोणतीही मोठी घटना घडल्यास त्याची जबाबदारी राज्य सरकारला घ्यावी लागेल असा इशारा त्यांनी दिला.









