प्रतिनिधी/ मुंबई
देशभरात नवसाला पावतो अशी ख्याती असलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला यंदा इतिहासात पहिल्यांदाच मोठा विलंब झाला आहे. रविवारी सकाळी 8 वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झालेल्या लालबागच्या राजाच्या मूर्तीचे विसर्जन समुद्रातील उंच लाटा आणि तांत्रिक अडचणींमुळे होऊ शकले नाही. मात्र, अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर राजाची भव्य मूर्ती तराफ्यावर यशस्वीरित्या चढवण्यात आली असून रात्री उशीरा विसर्जन झाले.
हा विलंब झाल्यामुळे कोट्यावधी भाविकांच्या मनात उत्सुकता होती. मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी या परिस्थितीवर स्पष्टीकरण दिले. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘लालबागच्या राजाचे विसर्जन भरती आणि ओहोटी वर अवलंबून असते. आम्ही चौपाटीवर पोहोचण्यापूर्वीच भरती सुरू झाली होती. त्यामुळे, भरती ओसरण्याची वाट पाहणे आवश्यक होते.’
विसर्जनाला विलंब का झाला
दरवर्षीप्रमाणे, दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे रविवारी सकाळी 8 वाजण्यापूर्वी लालबागचा राजाच्या मूर्तीचे खोल समुद्रात विसर्जन करण्याची तयारी सुरू होती. मात्र, रविवारी सकाळी आलेल्या समुद्रातील जोरदार भरतीमुळे आणि विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या नवीन तराफ्याच्या तांत्रिक अडचणींमुळे मूर्तीला तराफ्यावर चढवणे कठीण झाले. यामुळे, गेल्या आठ तासांपासून लालबागचा राजाची मूर्ती समुद्रातच होती.
पुण्यात मिरवणूकीची 33 तासांनी सांगता
मिरवणूकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचे नगारावादन, त्यामागे गंधर्व बँड तसेच शिवगर्जना पथकाचे वादन मिरवणूकीत झाले. गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला शनिवारी सायंकाळी 6 वाजता मुख्य मंडपापासून निघाली. रात्री 11 च्या दरम्यान मिरवणूकीच्या मुख्य रथाचे आगमन बेलबाग चौकात झाले होते. रविवारी पहाटे 3.45 वाजता श्रींचे विसर्जन झाले. त्यानंतर अनेक मंडळांनी वाजत गाजत गणरायाचे विसर्जन केले. 32 ते 33 तास उलटल्यानंतरही पुण्याची मिरवणूक सुरूच होती.









