सातारा :
स्व. दादामहाराज दिवस – रात्र टेनिस बॉल चषक स्पर्धेच्या माध्यमातुन महाराष्ट्राला आणि देशाला नवीन खेळाडू मिळतील असा आशावाद व्यक्त करीत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आयोजकांचे नियोजन उत्कृष्ट असल्यानेच दादामहाराज चषक क्रीकेट स्पर्धे गेली २२ वर्षे सातत्याने खेळवली जात आहे असे गौरवोद्गार व्यक्त केले.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्यासह विविध महसुल – प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आणि क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहमहाराज उर्फ दादा महाराज दिवस-रात्र टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते औपचारिक बोलत होते.
यावेळी दादा महाराज चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण एक ओव्हर फलंदाजी करुन केला. त्यानंतर स्पर्धेतील साखळीमधील दोन संघांमधील सामन्याला सुरुवात केली. जिल्हाधिकाऱ्यांनी खेळलेल्या सहाही चेंडूंवर चौफेर टोलेबाजी करत, क्रिकेटसह जिल्हयावर पकड असल्याचेच भासवले. जिल्हाधिकाऱ्यांच्या उत्स्फुर्त खेळीमुळे क्रिकेट मैदानावर वेगळाच माहौल निर्माण झाला होता. मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार उदयनराजे मित्र समुहाच्या वतीने जेष्ठ संघटक आणि क्रीडा मार्गदर्शक सुरेश साधले, माजी शिक्षण व अर्थ सभापती जि. प. सदस्य सुनिल काटकर, माजी नगराध्यक्ष निशांत पाटील, अमोल पाटुकले यांनी केले.
दरम्यान, दादा महाराज चषक क्रिकेट स्पर्धा दि. २३ फेब्रुवारी पर्यंत चालणार असून, दि. २३ रोजी अंतिम सामना होणार आहे.








