सांगली/प्रतिनिधी
तरुण भारतचे संस्थापक संपादक आणि सीमा लढ्यातील अग्रणी नेते स्वर्गीय बाबुराव ठाकुर यांच्या स्मृतिदिनानिमित्त तरुण भारत परिवाराच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने तरुण भारतच्या सांगली कार्यालयामध्ये शनिवारी भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बोलताना नितीन शिंदे म्हणाले, अन्यायाविरूद्ध झुंज आणि लोकशिक्षण त्याबरोबरच समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे दैनिक म्हणून तरुण भारतने आपले वेगळेपण जपले आहे. केंद्रात व राज्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांची सरकारे अस्तित्वात आल्यामुळे सीमालढा आजही तसाच राहिला आहे. सर्व राजकीय पक्षांनी मतभेद बाजूला ठेवून सीमालढा मार्गी लावण्यासाठी एकत्र येणे हीच खरी बाबुराव ठाकुर यांना आदरांजली ठरेल. तरुण भारतचे संपादक मंगेश मंत्री यांनी स्वागतपर भाषणात बाबुराव ठाकुर यांच्या कार्याला उजाळा दिला. जाहिरात व्यवस्थापक संजीव डाळिंबकर यांनी आभार मानले. मुख्य प्रतिनिधी संजय गायकवाड, व्यवस्थापक राहुल गोखले, संगणक विभाग प्रमुख गजानन घाडगे यांच्यासह तरुण परिवारातील सदस्य व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.








