वृत्तसंस्था /अँटेलिया (तुर्की)
आगामी पॅरिस ऑलिम्पिक पूर्वी येथे शुक्रवारपासून चार दिवसांच्या शेवटच्या पात्र फेरीच्या आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत कोटा पद्धतीनुसार स्थान मिळविण्यासाठी भारतीय तिरंदाजपटू दर्जेदार कामगिरी सिद्ध करण्याकरीता सज्ज झाले आहेत. आतापर्यंत पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजी या प्रकारात पुरुषांच्या वैयक्तिक विभागात भारताच्या धीरज बोमादेवराने आपली पात्रता सिद्ध केली आहे. अँटेलियात होणाऱ्या या स्पर्धेत धीरज बोमादेवरा, प्रविण जाधव, अनुभवी तरुणदीप राय यांचा भारतीय संघात समावेश आहे. तरुणदीप रायने आतापर्यंत 3 वेळा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले. 2004 च्या अॅथेन्स ऑलिम्पिकमध्ये तरुणदीप रायने पहिल्यांदा आपला सहभाग दर्शविला होता. महिलांच्या विभागात भारताची माजी टॉप सिडेड तिरंदाजपटू दीपिकाकुमारी गेले दोन आठवडे सराव प्रशिक्षण शिबिरात असून तिला दक्षिण कोरियाचे प्रशिक्षक तेक यांचे मार्गदर्शन लाभत आहे. गेल्या एप्रिलमध्ये शांघाय येथे झालेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत दीपिकाकुमारीने रौप्यपदक पटकाविले होते. अँटेलियातील या स्पर्धेत महिलांच्या विभागात दीपिकाकुमारी, भजन कौर आणि अंकिता भक्त सहभागी होत आहेत. या पात्र फेरीच्या शेवटच्या स्पर्धेत 80 देशांचे सुमारे 300 तिरंदाज सहभागी होत आहेत.