31 ऑगस्टपर्यंत आधार लिंक करणे अत्यंत गरजेचे
बेळगाव : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामगारांसाठी आधार आधारित पेमेंट सिस्टीम लागू करण्यात आली आहे. यानुसार नरेगा योजनेतील कर्मचाऱ्यांना आधार लिंक करणे आवश्यक आहे. मात्र, अद्यापि बहुतांशी कर्मचाऱ्यांनी आधार लिंक केलेले नाही. तब्बल तीन वेळा आधार लिंक करण्याची मुदत वाढविली आहे. पुन्हा आता 31 ऑगस्टपर्यंत ही मुदत वाढविली असून संबंधितांनी आधार लिंक करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पंचायतीने केले आहे. अकुशल कामगारांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. दरम्यान, केलेल्या कामाचा मोबदला थेट बँक खात्यात जमा केला जातो. यासाठी आधार आधारित पेमेंट सिस्टीम लागू केली आहे. त्यामुळे बँक खात्याला आधार लिंक करणे अनिवार्य आहे. मात्र, काही लाभार्थ्यांनी अद्याप लिंक केले नाही. त्यांच्यासाठी 31 ऑगस्ट शेवटची तारीख दिली आहे. जानेवारी-2024 पर्यंत नरेगा योजनेंतर्गत नोंदणी केलेल्यांना मंजुरी देण्यासाठी आधार लिंक अनिवार्य आहे. या प्रणालीची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी सर्व नरेगा कामगारांना आधार लिंक आवश्यक करण्यात आली आहे.
नवीन प्रणालीची अंमलबजावणी होणार-हर्षल भोयर, जि. पं. सीईओ
जिल्ह्यातील 98 टक्के नरेगा कामगारांची आधार लिंक नोंदणी पूर्ण झाली आहे. योजनेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी या नवीन प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे. शिवाय लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सुरळीत निधी जमा करण्यासाठी देखील ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.









