वृत्तसंसथा /अहमदाबाद
दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान आज शुक्रवारी येथे विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात आमनेसामने येणार असून उपांत्य फेरीपूर्वी लक्ष्याचा पाठलाग करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न दक्षिण आफ्रिका यावेळी करेल. तर अफगाणिस्तान अव्वल संघांना पराभूत करण्याची मोहीम पुन्हा राबवून उपांत्य फेरीतील स्थानासाठीच्या शर्यतीत राहण्यास इच्छुक असेल. दक्षिण आफ्रिकेपेक्षा अफगाणिस्तानसाठी परिस्थिती जास्त कठीण आहे. कारण टेम्बा बवुमाच्या संघाने आधीच भारत आणि ऑस्ट्रेलियासह उपांत्य फेरी गाठलेली आहे. आठ गुण झालेले अफगाणिस्तान चौथ्या स्थानासाठी पाकिस्तान आणि न्यूझीलंडबरोबर शर्यतीत आहे. केवळ दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळविल्यास ते या शर्यतीत राहतील. शिवाय पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या तुलनेत अफगाणांची निव्वळ धावसरासरीही निकृष्ट आहे. म्हणून, त्यांना मोठा विजय मिळवावा लागेल. आजच्या सामन्याचा निकाल काहीही लागला, तरी अफगाणिस्तानने आठ सामन्यांत चार विजय मिळवून आणि स्पर्धेतील परिपक्व खेळाने प्रचंड सन्मान मिळवला आहे.
इंग्लंड आणि पाकिस्तानला नमवल्यानंतर हशमतुल्लाह शाहिदीच्या नेतृत्वाखालील संघ पाच वेळचे विजेते ऑस्ट्रेलियावर विजय मिळविण्याच्या उंबरठ्यावर होता. पण ग्लेन मॅक्सवेलने एक अलौकिक खेळी करून त्यांच्या साऱ्या आशा फोल ठरविल्या. या असंभव वाटणाऱ्या पराभवामुळे अफगाण खेळाडू थोडेसे खचलेले असतील. पण त्यांना आता त्या पराभवातून बाहेर सरून उपांत्य फेरीत प्रवेशाच्या दृष्टीने सर्वोत्तम प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत धडाकेबाज फलंदाजी केलेली आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणे, शक्य तितक्या भरपूर धावा जमविणे आणि दक्षिण आफ्रिकेवर लक्ष्याचा पाठलाग करताना भरपूर दबाव टाकणे या धोरणास शाहिदीचे प्राधान्य असेल.
लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे कमकुवत दुवे दिसून आलेले आहेत. अफगाणिस्तानचे फिरकीपटू त्याचा फायदा घेऊ पाहतील. गेल्या काही वर्षांपासून फिरकी ही संघाची ताकद राहिली आहे पण आता ते वेगवान गोलंदाजांकडूनही यशाची अपेक्षा करू शकतात. कारण नवीन उल हक आणि अष्टपैलू अजमतुल्ला उमरझाई यांनी ऑस्ट्रेलियाविऊद्ध प्रभावी कमगिरी करून दाखविलेली आहे. अफगाणिस्तानची फलंदाजी हाही त्यांचा कमकुवत दुवा राहिला होता. पण या स्पर्धेत इब्राहिम झद्रान, रहमत शाह आणि कर्णधार शाहिदीसारख्या फलंदाजांना प्रथम फलंदाजी करताना किंवा लक्ष्याचा पाठलाग करताना परिस्थिती कशी हाताळायची हे कळलेले आहे. सालामीवीर गुरबाजला मात्र पुरेसे सातत्य राखता आलेले नसून अनुभवी मोहम्मद नबीकडूनही अधिक अपेक्षा आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या बाबतीत क्विंटन डी कॉक फॉर्मात असला, तरी कर्णधारा बवुमाला नेतृत्वास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. डेव्हिड मिलरलाही अद्याप अपेक्षित फॉर्म गवसलेला नाही.
संघ-
अफगाणिस्तान : हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन्, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रन, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्लाह उमरझाई, रशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फाऊखी, अब्दुल रहमान, नवीन उल हक.
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बवुमा (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुकवायो, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, लिझाद विल्यम्स.
वेळ : दुपारी 2 वा. प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, डिस्ने हॉटस्टार अॅप.









