पाकिस्तानच्या सैन्य रुग्णालयात दाखल : हाफिज सईदचा निकटवर्तीय
वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तानात कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा सह-संस्थापक आमिर हमजा एका दुर्घटनेत जखमी झाला आहे. हमजाला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या सुरक्षेत लाहोर येथील एका सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
आमिर हमजावर हल्ला झाला असून त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या असा दावा काही प्रसारमाध्यमांकडून करण्यात येत आहे, परंतु या दाव्याची आतापर्यंत पुष्टी होऊ शकलेली नाही. तर 2 दिवसांपूर्वीच लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी रजुल्लाह निजामनी उर्फ अबू सैफुल्ला एका हल्ल्यात मारला गेला होता.
दहशतवादी आमिर हमजा हा 1987 मध्ये लष्कर-ए-तोयबाच्या स्थापनेत सामील 17 जणांपैकी एक आहे. दहशतवादी कारवाया, प्रचार, निधी जमविणे आणि लष्कर-ए-तोयबाशी संबंधित अनेक वृत्तपत्रं आणि नियतकालिकांची जबाबदारी तो सांभाळत होता. लष्कर-ए-तोयबाच्या मध्यवर्ती सल्लागार समितीचा सदस्य राहिला असून अन्य दहशतवादी समुहांसोबत संबंध स्थापित करण्यात त्याचा सहभाग होता. हाफिज सईदच्या नेतृत्वाखालील लष्कर-ए-तोयबाला अन्य दहशतवादी संघटनांशी जोडण्याचे काम हमजाने केले होते.
सोव्हियत विरोधी युद्धात भाग
हमजाने 1980 च्या दशकात अफगाणिस्तानात सोव्हियत महासंघाच्या विरोधातील युद्धात भाग घेतला होता. यानंतर तो हाफिज सईद आणि अन्य दहशतवाद्यांसोबत जोडला गेला. हमजा हा हाफिज सईद आणि अब्दुल रहमान मक्कीचा निकटवर्तीय आहे. अमेरिकेने 2012 साली हमजाला जागतिक दहशतवादी घोषित केले होते. भारतावर झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये हमजाची भूमिका राहिली आहे. जम्मू येथील सुंजवां येथे सैन्याच्या ब्रिगेड मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तो सूत्रधार होता.









