बालाकोट एअरस्ट्राइकवर येणार सीरिज
बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताने मोजक्या चित्रपटांमध्ये काम केले असले तरीही तिचा स्वत:चा असा चाहतावर्ग आहे. अभिनेत्री आता लवकरच एका वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रणनीति : बालाकोट अँड बियाँड’मध्ये लारा मुख्य भूमिकेत असून याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. 2019 मध्ये पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता. हीच घटना आता सीरिजमध्ये दर्शविण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये भूमिका साकारणाऱ्या लाराने याचा टीझर शेअर करत ‘रणनीति : बालाकोट अँड बियाँड, सत्यघटनांवर प्रेरित एक नवी सीरिज लवकरच येतेय’ असे नमूद केले आहे. याच्या टीझरमध्ये अनेक लढाऊ विमाने दिसून येत आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये एका व्यक्ती ‘हे एक नया रण है और इसे जीतने के लिए एक नई रणनीति की जरुरत है’ असे म्हणत असल्याचे टीझरमध्ये ऐकू येते. या टीझरनंतर लाराचे चाहते आता या सीरिजची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. लारा दत्ता यापूर्वी अक्षय कुमारचा चित्रपट बेल बॉटममध्ये इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसून आली होती. तिच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. याचबरोबर ती कौन ‘बनेगा शिखरवति’ या सीरिजमध्ये दिसून आली होती.









