वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2023 आयपीएल हंगामासाठी सनरायजर्स हैदराबाद संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी विंडीजचा माजी कर्णधार आणि जागतिक दर्जाचा फलंदाज ब्रायन लाराची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा संघव्यवस्थापनाने केली. यापूर्वी या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू टॉम मुडी कार्यरत होते.
विंडीजचा 53 वषीय ब्रायन लारा टी-20 संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी प्रथमच करारबद्ध झाला. गेल्या डिसेंबरमध्ये ब्रायन लारा सनरायजर्स हैदराबाद संघाच्या प्रशिक्षण पथकात दाखल झाला होता. त्यावेळी त्याच्याकडे फलंदाजी प्रशिक्षक आणि सल्लागारपद सोपविण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाच्या टॉम मुडीकडे दोनवेळा सनरायजर्स हैदराबाद संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची सूत्रे होती. 2013 आणि 2019 या कालावधीत टॉम मुडी यशस्वी प्रशिक्षक म्हणून ओळखले गेले.
मुडीच्या मार्गदर्शनाखाली सनरायजर्स हैदराबाद संघाने आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासामध्ये पाचवेळा प्ले ऑफ गटात स्थान मिळविले तर 2016 साली या संघाने आयपीएल जिंकली होती. 2020 साली सनरायजर्स हैदराबाद संघाने 56 वषीय मुडीच्या जागी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू टेव्हर बेलीसची प्रमुख प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती.
गेल्या वषी टॉम मुडीचे सनरायजर्स हैदराबाद संघात पुनरागमन झाले होते आणि त्याच्याकडे क्रिकेट संचालकपद सोपविण्यात आले होते. 2021 आयपीएल स्पर्धेत सनरायजर्स हैदराबाद संघाची कामगिरी निकृष्ट झाली. या संघाला केवळ तीन सामने जिंकता आले. स्पर्धेच्या गुणतक्त्यात हैदराबाद संघ शेवटच्या स्थानावर होता. त्या पार्श्वभूमीवर, टॉम मुडीची प्रमुख प्रशिक्षकपदावरून उचलबांगडी करण्यात आली.
टॉम मुडीकडे या संघाचे दुसऱयांदा मुख्य प्रशिक्षकपद सोपविल्यानंतर 2022 आयपीएल क्रिकेट हंगामात हैदराबाद संघाने सहा सामने जिंकले तर आठ सामने गमावले होते. गेल्या वषीच्या आयपीएल स्पर्धेत एकूण दहा संघांचा सहभाग होता. पुढील वषीच्या जानेवारी महिन्यात संयुक्त अरब अमिरात येथे होणाऱया सहा संघांच्या आयएलटी-20 क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱया डेझर्ट व्हायपर्स संघाच्या प्रशिक्षकवर्गामध्ये मुडी दाखल होणार आहे.









