नगरसेवक डॉ. शंकरगौडा पाटील यांची मनपा आयुक्तांकडे मागणी
बेळगाव : महापालिकेकडून लॅपटॉप वितरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे. यावरूनच शनिवार दि. 31 रोजी झालेल्या लेखा स्थायी समिती बैठकीत सदस्य डॉ. शंकरगौडा पाटील आणि प्रभारी मुख्य लेखाधिकारी मंजुनाथ बिळगीकर यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. यानंतर आता नगरसेवक पाटील यांनी मनपाकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या लॅपटॉप संबंधीच्या टेंडरची संपूर्ण माहिती आणि थर्ड पार्टी परीक्षणाबाबत येत्या सात दिवसात माहिती देण्यात यावी, असे लेखी पत्र महापालिका आयुक्तांना सोमवारी दिले आहे.
महानगरपालिकेकडून 121 लॅपटॉप विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहेत. त्या लॅपटॉपचा दर 35000 रुपये असताना महापालिकेने 49000 रुपये दराने पुरवठ्याच्या ठेका दिला आहे. याबाबतचा थर्ड पार्टी अहवालही पक्षपाती असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक डॉ. पाटील यांनी केला आहे. जो लॅपटॉप ऑनलाईनवर 25000 रुपयाला मिळतो व होलसेल बाजारात 20000 रुपयाला मिळतो. तो लॅपटॉप महापालिकेने 490000 रुपयाला खरेदी केला आहे. त्यामुळे आज मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
माहिती देण्यास चालढकल
लॅपटॉप वितरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत यापूर्वी दलित संघटनेनेदेखील मोर्चा काढला होता. या प्रकरणात आता स्थायी समिती सदस्यांनीदेखील प्रवेश करून गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. याबाबतची सविस्तर माहिती देण्याची मागणी नगरसेवक डॉ. शंकरगौडा पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे केली असता माहिती देण्यास चालढकल केली जात आहे. त्यामुळे त्यांनी सोमवारी लॅपटॉप वितरण टेंडर आणि थर्ड पार्टी परीक्षण याबाबतची माहिती देण्याचा लेखी अर्ज मनपा आयुक्तांकडे केला आहे. यावर महापालिका आयुक्त काय उत्तर देणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे. नगरसेवक पाटील यांनी लॅपटॉपच्या बॉक्सवरील एमआरपी दर असलेला फोटोही घेतला आहे. एकंदरीत सध्या लॅपटॉप वितरण गैरव्यवहार प्रकरणाची चर्चा महापालिका वर्तुळात सुरु आहे.









