मेंडिसचे 5 बळी, करुणारत्ने-डिसिल्वाची अभेद्य अर्धशतकी भागीदारी
वृत्तसंस्था/ कोलंबो
लंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने वेदना सहन करीत डिसिल्वासमवेत दुसऱया कसोटीच्या तिसऱया दिवशी आपल्या संघाची पाकवरील आघाडी 323 धावांपर्यंत वाढविली. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा लंकेने दुसऱया डावात 50 षटकांत 5 बाद 175 धावा जमविल्या होत्या. करुणारत्ने 27 व धनंजय डिसिल्वा 30 धावांवर खेळत होते.
या कसोटीत लंकेने पहिल्या डावात 378 धावा जमविल्यानंतर पाकचा पहिला डाव रमेश मेंडिस व प्रभात जयसूर्या यांच्या भेदक माऱयासमोर 88.1 षटकांत 231 धावांत गुंडाळत 147 धावांची आघाडी मिळविली. 7 बाद 191 या धावसंख्येवरून पाकने दिवसाच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि उर्वरित फलंदाजांनी 231 धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रभात जयसूर्याने हसन अलीला बाद केल्यानंतर लंकेने त्यांचा डाव झटपट गुंडाळला. मेंडिसने 47 धावांत 5 तर जयसूर्याने 80 धावांत 3 बळी मिळविले. यासिर शहाने 97 चेंडूंचा मुकाबला करीत 26 धावा जमविल्या. तो शेवटच्या गडय़ाच्या रूपात बाद झाला.

लंकेला दुसऱया डावात पाकच्या अचूक माऱयापुढे जलद धावा जमविता आल्या नाहीत. शेवटच्या सत्रात पाकने त्यांचे चार बळी मिळविले. मात्र करुणारत्ने व डिसिल्वा यांच्या 59 धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे लंकेला आपली आघाडी आणखी भक्कम करता आली. करुणारत्ने जखमी असल्याने गरज लागल्यास त्याला फलंदाजीला उतरवण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे ओशादा फर्नांडोसमवेत निरोशन डिक्वेला सलामीस आला होता. पण ही हंगामी जोडी यशस्वी ठरली नाही. डिक्वेला 15, ओशादा 19 धावा काढून बाद झाले. बाबर आझमने या सामन्यात तिसरा झेल सोडताना कुसल मेंडिसला जीवदान दिले. पण त्यालाही त्याचा लाभ घेता आला नाही. तो 15 धावा काढून बाद झाला.
अँजेलो मॅथ्यूज 35 धावा काढून बाद झाल्यानंतर करुणारत्ने फलंदाजीस उतरला. फॉर्ममध्ये असलेला दिनेश चंडिमल 21 धावांवर बाद झाल्यानंतर त्यांची स्थिती 5 बाद 117 अशी झाली. पण डिसिल्वा व करुणारत्ने यांनी आणखी पडझड होऊ न देता खेळ थांबवण्यात आला तोवर 5 बाद 176 धावांची मजल मारून दिली. पहिल्या कसोटीत पाकने शेवटच्या डावात 342 धावांचा यशस्वी पाठलाग करीत रोमांचक विजयासह मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. लंकेला आता बरोबरी साधण्याची संधी मिळाली आहे.
संक्षिप्त धावफलक ः लंका पहिला डाव 378,
पाक पहिला डाव सर्व बाद 231 ः इमाम उल हक 32, बाबर आझम 16, मोहम्मद रिझवान 24, फवाद आलम 24, आघा सलमान 62 (126 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), मोहम्मद नवाझ 12, यासिर शहा 26, हसन अली 21, अवांतर 4. गोलंदाजी ः रमेश मेंडिस 5-47, प्रभात जयसूर्या 3-80, धनंजय डिसिल्वा 1-15, असिता फर्नांडो 1-62.
लंका दुसरा डाव 50 षटकांत 5 बाद 176 ः डिक्वेला 15, ओशादा फर्नांडो 19, कुसल मेंडिस 15, मॅथ्यूज 35 (62 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), चंडिमल 21, करुणारत्ने खेळत आहे 27 (51 चेंडूत 2 चौकार), धनंजय डिसिल्वा खेळत आहे 30 (52 चेंडूत 6 चौकार), अवांतर 14. गोलंदाजी ः नसीम शहा 2-29, हसन अली 1-41, मोहम्मद नवाझ 1-32, आघा सलमान 1-18.









