अब्रार अहमदचे 4 बळी, डिसिल्वाचे अर्धशतक, पाक प. डाव 2 बाद 145
वृत्तसंस्था/ कोलंबो
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत येथील एसएससी स्टेडियमवर सोमवारपासून सुरु झालेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात पाकच्या भेदक गोलंदाजीसमोर यजमान लंकेचा पहिला डाव 166 धावात आटोपला. त्यानंतर दिवसअखेर पाकने चोख प्रत्युत्तर देताना पहिल्या डावात 28.3 षटकात 2 बाद 145 धावा जमविल्या. पाकतर्फे अब्दुल्ला शफीक आणि शान मसूद यांनी नाबाद अर्धशतके झळकवली. या मालिकेत पाकने पहिली कसोटी जिंकून लंकेवर 1-0 अशी आघाडी मिळविली आहे.
या दुसऱ्या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. नसीम शाह आणि अब्रार अहमद यांच्या भेदक गोलंदाजीसमोर लंकेचा पहिला डाव 48.4 षटकात 166 धावात आटोपला. लंकाचा डाव तिसऱ्या षटकापासूनच गडगडला. मदुष्का एकेरी धाव घेण्याच्या नादात 4 धावावर धावचीत झाला. त्यानंतर आफ्रिदीने कुशल मेंडीसला 6 धावावर झेलबाद केले. नसीम शाहने मॅथ्यूजला 9 धावांवर सर्फराज अहमदकडे झेल देण्यास भाग पाडले. नसीम शाहने लंकेला आणखी एक धक्का देताना कर्णधार करुणारत्नेचा त्रिफळा उडविला. त्याने 3 चौकारांसह 17 धावा जमविल्या. उपहारावेळी लंकेची स्थिती 4 बाद 79 अशी केविलवाणी होती.

खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर चंडीमल आणि डिसिल्वा यांनी पाचव्या गड्यासाठी 85 धावांची भर घातली. नसीम शाहने चंडीमलला बाद केले. त्याने 4 चौकारांसह 34 धावा जमविल्या. अब्रार अहमदने समरविक्रमाला खाते उघडण्यापूर्वी बाद केले. धनंजय डिसिल्वा अब्रार अहमदच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 1 षटकार आणि 9 चौकारांसह 57 धावा जमविल्या. प्रभात जयसूर्या चोरटी धाव घेण्याच्या नादात धावचीत झाला. अब्रार अहमदने आसिता फर्नांडोचा 8 धावांवर त्रिफळा उडविला. रमेश मेंडीसने 44 चेंडूत 3 चौकारांसह 27 धावा जमविल्या. अब्रार अहमदने त्याला झेलबाद करुन लंकेला 166 धावांवर रोखले. अब्रार अहमदने 69 धावात 4, नसीम शाहने 41 धावात 3 तर शाहिन आफ्रिदीने 44 धावात 1 गडी बाद केला. चहापानावेळी लंकेचा पहिला डाव 166 धावात समाप्त झाला.
खेळाच्या शेवटच्या सत्रात पाकने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली. पण आसिता फर्नांडोने सलामीच्या इमाम उल हकला 6 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर अब्दुल्ला शफिक आणि शान मसूद या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 108 धावांची भागिदारी केली. आसिता फर्नांडोने शान मसूदला झेलबाद केले. त्याने 47 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 51 धावा जमविल्या. दिवसअखेर शफिक 2 षटकार आणि 7 चौकारांसह 74 तर कर्णधार बाबर आझम 1 चौकारासह 8 धावांवर खेळत आहेत. लंकेतर्फे आसिता फर्नांडोने 41 धावात 2 गडी बाद केले. पाकचा संघ 21 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 8 गडी खेळवायचे आहेत.
संक्षिप्त धावफलक – लंका प. डाव : 48.4 षटकात सर्व बाद 166 (धनंजय डिसिल्वा 57, चंडीमल 34, रमेश मेंडीस 27, करुणारत्ने 17, अब्रार अहमद 4-69, नसीम शाह 3-41, शाहिन आफ्रिदी 1-44), पाक प. डाव 28.3 षटकात 2 बाद 145 (शफीक खेळत आहे 74, बाबर आझम खेळत आहे 6, इमाम उल हक 6, शान मसूद 51, अवांतर 6, आसिता फर्नांडो 2-41).









