नेदरलँड्सवर 16 धावांनी विजय, कुशल मेंडिस सामनावीर, मॅक्सचे अर्धशतक निष्फळ

वृत्तसंस्था /गिलाँग (व्हिक्टोरिया)
आयसीसी टी-20 विश्वचषक पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत सुरू असलेल्या प्राथमिक फेरीच्या ‘अ’ गटातील गुरुवारच्या सामन्यात श्रीलंकेने नेदरलँड्सचा 16 धावांनी पराभव करत सुपर-12 संघांमधील स्थान निश्चित केले. येत्या रविवारपासून सुरू सुपर 12 फेरीला सुरुवात होणार आहे.. गुरुवारच्या सामन्यात लंकेच्या कुशल मेंडीसला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

या प्राथमिक फेरीच्या सामन्यात लंकेने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 162 धावा जमविल्या. त्यानंतर नेदरलँड्सने 20 षटकात 9 बाद 146 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 16 धावांनी गमवावा लागला. लंकन संघातील कुशल मेंडीसची 79 धावांची खेळी निर्णायक ठरली. तर नेदरलँड्स संघातील सलामीचा फलंदाज मॅक्स ओ दाऊदची नाबाद 71 धावांची खेळी वाया गेली.
लंकेच्या डावामध्ये कुशल मेंडीस आणि निशांका यांनी पहिल्या गडय़ासाठी 36 धावांची भागीदारी केली. पण नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी लंकेचे दोन फलंदाज झटपट बाद केले. मिकेरेनने निशांकाचा त्रिफळा उडविला. त्याने 1 षटकारासह 14 धावा जमविल्या. मिकेरेनने आपल्या याच षटकातील चौथ्या चेंडूवर धनंजय डिसिल्वाला खाते उघडण्यापूर्वी पायचीत केले. कुशल मेंडीस आणि असालंका यांनी तिसऱया गडय़ासाठी 60 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. असालेंकाने 30 चेंडूत 3 चौकारांसह 31 धावा जमविल्या. भानुका राजपक्षेने 13 चेंडूत 2 चौकारांसह 19 तर कर्णधार शनाकाने 1 षटकारासह 8 धावा केल्या. कुशल मेंडीस सहाव्या गडय़ाच्या रूपात डावातील शेवटच्या षटकात बाद झाला. त्याने 44 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकारांसह 79 धावा झळकविल्या. लंकेच्या डावामध्ये 7 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. नेदरलँड्सतर्फे मिकेरेन आणि बेस डी लीडे यांनी प्रत्येकी 2 तर क्लासेन आणि व्हॅन डेर गुगटेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मेंडीसच्या शानदार फलंदाजीमुळे लंकेने शेवटच्या 10 षटकात 102 धावा फटकावल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना नेदरलँड्सच्या डावात सलामीच्या मॅक्स ओ दाऊदने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 53 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 71 धावा जमविल्या. डी लीडेने 10 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 14, कूपरने 19 चेंडूत 2 चौकारांसह 16, कर्णधार एडवर्ड्सने 15 चेंडूत 3 चौकारांसह 21 धावा जमविल्या. लंकेच्या अचूक गोलंदाजीसमोर नेदरलँड्सचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाले. नेदरलँड्सच्या डावात 4 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे हसरंगाने 28 धावात 3 तर महेश तिक्षणाने 32 धावात 2 तसेच कुमारा आणि बिनुरा फर्नांडो यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या गुणतक्त्यात लंकन संघाने ‘अ’ गटातून तीन सामन्यात 4 गुण घेत सुपर-12 संघातील आपले स्थान निश्चित केले. गुरुवारच्या अन्य एका सामन्यात नामिबिया संघ पराभूत झाल्याने नेदरलँड्सनेही सुपर-12 मध्ये प्रवेश केला आहे. ‘अ’ गटातून नेदरलँड्सने 4 गुण मिळविले असून त्यांनी -0.162 रनरेट राखला आहे. 2014 साली विश्वविजेतेपद मिळविणाऱया लंकन संघाने अलीकडेच संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अजिंक्मयपद मिळविताना अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता. पण टी-20 विश्वचषक प्राथमिक फेरीच्या ‘अ’ गटातील सलामीच्या सामन्यात लंकन संघाला नामिबियाकडून गेल्या रविवारी हार पत्करावी लागली होती.
संक्षिप्त धावफलक
लंका 20 षटकात 6 बाद 162 (कुशल मेंडीस 79, असालंका 31, निशांका 14, राजपक्षे 19, मिकेरेन 2-25, डी लीडे 2-31, क्लासेन 1-34, गुगटेन 1-31), नेदरलँड्स 20 षटकात 9 बाद 146 (मॅक्स ओ दाऊद नाबाद 71, डी लीडे 14, कूपर 16, एडवर्ड्स 21, हसरंगा 3-28, महेश तिक्षणा 2-32, कुमार 1-28, बिनुरा फर्नांडो 1-33).









