डिसिल्वाचे शतक, करुणारत्नेचे अर्धशतक, पाकला अद्याप 419 धावांची गरज
वृत्तसंस्था/ गॅले
धनंजय डिसिल्वाने नोंदवलेले शतक व कर्णधार दिमुथ करुणारत्नेच्या अर्धशतकामुळे लंकेने दुसऱया कसोटीच्या चौथ्या दिवशी दुसरा डाव 8 बाद 360 धावांवर घोषित करून पाकिस्तानला विजयासाठी 508 धावांचे कठीण आव्हान दिले. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबविण्यात आला तेव्हा पाकने दुसऱया डावात 28 षटकांत 1 बाद 89 धावा जमविल्या असून विजयासाठी त्यांना अद्याप 419 धावांची गरज आहे. गुरुवारी सामन्याचा शेवटचा दिवस आहे. इमाम उल हक 46 व कर्णधार बाबर आझम 26 धावांवर खेळत होते.
लंकेने या सामन्यात पहिल्या डावात 378 धावा जमविल्यानंतर पाकचा पहिला डाव 231 धावांत गुंडाळून लंकेने 147 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर लंकेने तिसऱया दिवशअखेर दुसऱया डावात 5 बाद 176 धावा जमविल्या होत्या. चौथ्या दिवशी लंकेने 91.5 षटकांत 8 बाद 360 धावांवर घोषित केला. पाकने पहिली कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेतली असल्याने लंकेला मालिका बरोबरीत सोडविण्याची संधी मिळाली आहे. पावसामुळे चौथ्या दिवशी बराच वेळ खेळ थांबवावा लागला होता.
पाकला ही मालिका जिंकण्यासाठी हा सामना अनिर्णीत राखावा लागेल किंवा अशक्यप्राय विजय मिळवावा लागेल. चौथ्या डावात सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम विंडीजच्या नावावर असून 2003 मध्ये अँटिग्वा कसोटीत त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 418 धावांचा पाठलाग करून विजय मिळविला होता. लंकेला विजय मिळविण्यासाठी आणखी 9 गडी बाद करावे लागतील. स्पिनर प्रभात जयसूर्याने अब्दुल्ला शफीकला (16) बाद करून पाकला पहिला धक्का दिला आहे. त्यानंतर इमाम व बाबर यांनी सावध खेळत आणखी पडझड होऊ दिली नाही.
डिसिल्वाचे नववे शतक
धनंजय डिसिल्वाने धावचीत होण्याआधी 109 धावा जमविल्या. तो बाद झाल्यानंतर लंकेने डाव घोषित केला. त्याने करुणारत्नेसमवेत सहाव्या गडय़ासाठी 126 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. पाठीच्या वेदना सहन करीत करुणारत्नेने 61 धावांचे योगदान दिले. त्याने 105 चेंडूत फक्त 3 चौकार मारताना कसोटीतील 6000 धावांचा टप्पाही पार केला. नंतर क्षेत्ररक्षणासही तो आला नाही. त्याच्याजागी डिसिल्वाने नेतृत्व सांभाळले. 27 धावांवरून सुरुवात करीत डिसिल्वाने नवाझला चौकार ठोकत नववे कसोटी शतक पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत 171 चेंडूत 16 चौकार मारले. दुनिथ वेलालगेने 18, रमेश मेंडिसने 54 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 45 धावा फटकावल्या. पाकच्या नवाझ व नसीम शहा यांनी प्रत्येकी 2, यासिर शहा, नौमन अली, सलमान आघा यांनी एकेक बळी मिळविले.
पाकने 2015 मध्ये पल्लिकेले येथील कसोटीत सर्वाधिक 377 धावांचा यशस्वी पाठलाग करून विजय मिळविला होता. याशिवाय या मालिकेत गॅलेतील पहिल्या कसोटीत 342 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.
संक्षिप्त धावफलक ः लंका प.डाव 378, पाक प.डाव 231, लंका दुसरा डाव 91.5 षटकांत 8 बाद 360 डाव घोषित ः मॅथ्यूज 35, करुणारत्ने 61, डिसिल्वा 109 (171 चेंडूत 16 चौकार), रमेश मेंडिस नाबाद 45 (54 चेंडूत 5 चौकार), चंडिमल 21, वेलालगे 18, अवांतर 22. गोलंदाजी ः नसीम शहा 2-44, नवाझ 2-75, यासिर शहा 1-80, नौमन अली 1-54, सलमान 1-41. पाक दुसरा डाव 28 षटकांत 1 बाद 89 ः शफीक 16, इमाम उल हक खेळत आहे 46 (80 चेंडूत 4 चौकार), बाबर आझम खेळत आहे 26 (38 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), अवांतर 1. जयसूर्या 1-46.









