वृत्तसंस्था/ पल्लीकेली
येथे रविवारी सुरू असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात यजमान लंकेने अफगाणला विजयासाठी 309 धावांचे आव्हान दिले. प्रथम फलंदाजी करताना लंकेने 50 षटकात 6 बाद 308 धावा जमविल्या. लंकेतर्फे कर्णधार कुशल मेंडीस, समरविक्रमा, असालेंका आणि लियानगे यांनी अर्धशतके झळकविली.
या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. त्यांचे पहिले दोन फलंदाज 36 धावात तंबूत परतले. निशांकाने 3 चौकारांसह 18 तर अविष्का फर्नांडोने 5 धावा जमविल्या. कर्णधार कुशल मेंडीस आणि समरविक्रमा यांनी तिसऱ्या गड्यासाठी 103 धावांची भागिदारी केली. समरविक्रमाने 3 चौकारांसह 61 चेंडूत 52 धावा जमविल्या. कुशल मेंडीसने 65 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 61 धावा केल्या. लंकेचे हे दोन फलंदाज पाठोपाठ बाद झाल्यानंतर लियानगे आणि आसालेंका यांनी संघाला मजबूत स्थितीत नेले. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 111 धावांची शतकी भागिदारी केली. लियानगेने 48 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 50 धावा झळकाविल्या. हसरंगाने 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. मात्र असालेंकाला आपले शतक पूर्ण करता आले नाही. त्याने 74 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 97 धावा झोडपल्या. लंकेच्या डावात 5 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. अफगाणतर्फे अझमतुल्ला ओमरझाईने 56 धावात 3 तसेच फरुकी आणि नूर अहमद व कयास अहमद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – लंका 50 षटकात 6 बाद 308 (असालेंका नाबाद 97, कुशल मेंडीस 61, समरविक्रमा 52, लियानगे 50, निशांका 18, हसरंगा 14, ए. ओमरझाई 3-56).









