वृत्तसंस्था/ गॅले
यजमान लंका आणि आयर्लंड यांच्यात येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत सोमवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी लंकेने आपला पहिला डाव 6 बाद 591 धावांवर घोषित केला. त्यानंतर मात्र आयर्लंडचा पहिला डाव गडगडला. दिवसअखेर आयर्लंडने 7 बाद 117 धावा जमविल्या होत्या. लंकेच्या पहिल्या डावात 4 फलंदाजांनी शतके झळकविली.
लंकेने 4 बाद 386 या धावसंख्येवरून दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांनी 131 षटकात 6 बाद 591 धावांवर डावाची घोषणा केली. कर्णधार करुणारत्ने आणि कुशल मेंडीस यांनी या सामन्यातील पहिल्या दिवशी शतके झळकविली होती तर दिनेश चंडीमल आणि समरविक्रमा यांनी सोमवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी नाबाद शतके नोंदविली. करुणारत्नेने 235 चेंडूत 15 चौकारांसह 179, कुशल मेंडीसने 193 चेंडूत 1 षटकार आणि 18 चौकारांसह 140 धावा झळकविल्या. दिनेश चंडीमलने 155 चेंडूत 12 चौकारांसह नाबाद 102 तर समरविक्रमाने 114 चेंडूत 11 चौकारांसह नाबाद 104 धावा झळकविल्या. धनंजय डिसिल्वा 12 धावांवर तर जयसूर्या 16 धावांवर बाद झाले. चंडीमल आणि समरविक्रमा यांनी सातव्या गड्यासाठी 183 धावांची अभेद्य भागीदारी केली. आयर्लंडतर्फे कॅम्फरने 2 तर अॅडेर, मॅकब्राईन, व्हाईट आणि डॉकरेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
लंकेने आपल्या डावाची घोषणा केल्यानंतर आयर्लंडने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली. पण प्रभात जयसूर्याच्या अचूक गोलंदाजीसमोर आयर्लंडची स्थिती दिवसअखेर 7 बाद 117 अशी केविलवाणी झाली आहे. आयर्लंडच्या डावात मॅकॉलमने 5 चौकारांसह 35, टेक्टरने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 34, पीटर मूरने 2 चौकारांसह 14 तर टकेरने 2 चौकारांसह नाबाद 21 धावा जमविल्या. प्रभात जयसूर्याने 42 धावात 5 तर विश्व फर्नांडोने 22 धावात 2 गडी बाद केले. आयर्लंडचा संघ 474 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 3 गडी खेळावयाचे आहेत. या सामन्यात आयर्लंड संघावर मोठ्या पराभवाची छाया वावरत आहे.
संक्षिप्त धावफलक
लंका प. डाव 131 षटकात 6 बाद 591 (डाव घोषित) (करुणारत्ने 179, कुशल मेंडीस 140, चंडीमल नाबाद 102, समरविक्रमा नाबाद 104, कॅम्फर 2-84, अॅडेर, मॅकब्राईन, व्हाईट, डॉकरेल प्रत्येकी 1 बळी), आयर्लंड प. डाव 45 षटकात 7 बाद 117 (मेकॉलम 35, टेक्टर 34, मूर 14, टकर खेळत आहे 21, प्रभात जयसूर्या 5-42, विश्व फर्नांडो 2-22).









