वृत्तसंस्था /डर्बी
क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात लंकन महिला क्रिकेट संघाने बलाढ्या इंग्लंडवर आपला पहिला ऐतिहासिक मालिका विजय नोंदवला. उभय संघात झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत लंकेने इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. या मालिकेतील येथे झालेल तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात लंकेने नाईटच्या नेतृत्वाखालील इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा 18 चेंडू बाकी ठेवून सात गड्यांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात लंकेची कर्णधार चमारी अट्टापटूने फलंदाजी करताना 28 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारासह 44 तर गोलंदाजीत तिने 21 धावात 3 गडी बाद केले. चमारी अट्टापटूला मालिकावीर आणि सामनावीर हे दोन्ही पुरस्कार मिळाले. या शेवटच्या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली.
लंकेच्या अचूक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर इंग्लंडचा डाव 19 षटकात 116 धावात आटोपला. त्यानंतर लंकेने 17 षटकात 3 बाद 117 धावा जमवत हा सामना आणि मालिकाही जिंकली. लंकेची कर्णधार चमारी अट्टापटूने या मालिकेत फलंदाजीत 114 धावा तर गोलंदाजीत 5 गडी बाद केले. इंग्लंडच्या डावामध्ये माइया बुशेरने 18 चेंडूत 4 चौकारासह 23, अॅमी जोन्सने 17 चेंडूत 3 चौकारासह 20, गिब्सनने 15 चेंडूत 3 चौकारासह 21, कर्णधार नाईटने 19 चेंडूत 2 चौकारासह 18, कॅप्सेने 8 चेंडूत 2 चौकारासह 9, केम्पने 1, डीनने 5 तर क्रॉसने 2 धावा केल्या. इंग्लंडच्या डावात 16 चौकार नोंदवले गेले. लंकेततर्फे चमारी अट्टापटूने 21 धावात 3, प्रभोदिनीने 16 धावात 2, दिलहरीने 16 धावात 2, रणविराने 20 धावात 1 तर इनोशीने 15 धावात एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार चमारी अट्टापटू आणि अनुष्का संजीवनी या सलामीच्या जोडीने 6.4 षटकात 65 धावांची भागीदारी केली. इंग्लंडच्या कॅप्सेने अट्टापटूला डीनकरवी झेलबाद केले. तिने 28 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारासह 44, संजीवनीने 16 चेंडूत 1 चौकारासह 20, समरविक्रमाने 28 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 26, गुणरत्नेने 1 चौकारासह 8 तर परेराने 1 चौकारासह नाबाद 9 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड 19 षटकात सर्वबाद 116 (बुशेर 23, नाईट 18, जोन्स 20, गिब्सन 21, ग्लेन नाबाद 16, अवांतर 1, चमारी अट्टापटू 3-21, प्रबोधिनी 2-16, दिलहरी 2-16, प्रियदर्शनी 1-15, रणविरा 1-20), लंका 17 षटकात 3 बाद 117 (चमारी अट्टापटू 44, संजीवनी 20, समरविक्रमा नाबाद 26, गुणरत्ने 8, परेरा नाबाद 9, अवांतर 10, ग्लेन 2-23, कॅप्से 1-21).









