अंतिम लढतीत नेदरलँड्सवर 128 धावांनी विजय
वृत्तसंस्था/ हरारे
झिम्बाब्वेतील हरारे येथे रविवारी श्रीलंका आणि नेदरलँड्स यांच्यात विश्वचषक पात्रता स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला गेला. या सामन्यात श्रीलंकेने नेदरलँड्सचा 128 धावांनी पराभव केला. दरम्यान, श्रीलंका आणि नेदरलँड्सने सुपर सिक्समध्ये अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळवून आगामी विश्वचषकात आधीच आपले स्थान निश्चित केले आहे. यामुळे या पराभवाचा नेदरलँड्सवर कोणताही परिणाम झाला नाही.
या स्पर्धेत 10 संघांनी सहभाग घेतला. दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिज व्यतिरिक्त झिम्बाब्वे, स्कॉटलंड आणि ओमानचे संघ विश्वचषकासाठी पात्र ठरु शकले नाहीत. 1975 आणि 1979 मध्ये स्पर्धा जिंकणारा वेस्ट इंडिज संघ प्रथमच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळताना दिसणार नाही.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव 47.5 षटकांत 233 धावांवर संपुष्टात आला. लंकन संघाकडून सहान आर्चिगेने सर्वाधिक चार चौकारासह 57 धावा केल्या. चरित असलंकाने 36, कुशल मेंडिसने 43, वानिंदू हसरंगाने 29 आणि पाथुम निसांकाने 23 धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. नेदरलँड्सकडून लोगान वॅन, रायन क्लेन, विक्रमजीत सिंग, शकीब झुल्फिकार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
नेदरलँड्सचा 105 धावांत खुर्दा
विजयासाठी 234 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा डाव 23.3 षटकांत 105 धावांवर आटोपला. मॅक्स ओ डोडने सर्वाधिक 33 धावा केल्या तर लोगान वॅनने नाबाद 20 व विक्रमजीत सिंगने 13 धावा फटकावल्या. इतर कोणत्याही खेळाडूला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. लंकेकडून महिष तीक्षणाने 31 धावांत 4 गडी तर दिलशान मधुशंकाने 18 धावांत 3 गडी बाद करत विजयात मोलाची भूमिका बजावली. वहिंदू हसारंगाने दोन गडी बाद केले.









