समरविक्रमा, कुसल मेंडिसची अर्धशतके
वृत्तसंस्था/ कोलंबो
आशिया कप सुपर 4 मधील ‘करो या मरो’ सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशला विजयासाठी 258 धावांचे आव्हान दिले. श्रीलंकेने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 257 धावा केल्या. लंकेकडून सदीरा समरविक्रमाने सर्वाधिक 93 धावा केल्या. समरविक्रमाने केलेल्या या वादळी खेळीमुळे लंकेला अडीचशेचा टप्पा गाठता आला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशचा डाव 48.1 षटकात 236 धावात आटोपला. बांगलादेशच्या रिदॉयचे अर्धशतक वाया गेले.
बांगलादेशच्या डावात रिदॉयने 1 षटकार आणि 7 चौकारांसह 82, रहिमने 29, मेहदी हसन मिराझने 4 चौकारांसह 28 तर मोहम्मद नईमने 1 चौकारासह 21 धावा जमविल्या. लंकेतर्फे महेश तिक्ष्णा, शनाका आणि पथिरना यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सहाव्या षटकातच यजमान संघाला पहिला धक्का दिमुथ करुणारत्नेच्या रुपाने बसला. 18 धावा करणाऱ्या करुणारत्नेला हसन महमूदने बाद केले. यानंतर पथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी दुसऱ्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी करत डाव सावरला. मेंडिसने 73 चेंडूत 50 धावा केल्या, ज्यात 6 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. तर निसांकाने 5 चौकारांच्या मदतीने 40 धावा केल्या. शरीफुल इस्लामने निसांकाला बाद करून ही भागीदारी तोडली. यानंतर असालंका (10), धनजंय डी सिल्वा (6) हे स्वस्तात बाद झाल्याने लंकेची 5 बाद 164 अशी स्थिती झाली होती.
अशा स्थितीत सदिरा समरविक्रमा आणि कर्णधार दासून शनाका यांनी डावाची सूत्रे हाती घेत सहाव्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. मात्र, शेवटच्या षटकांमध्ये वेगाने धावा करण्याच्या नादात शनाका बाद झाला. त्याने 32 चेंडूत 24 धावा केल्या. तर समरविक्रमाने 72 चेंडूत 93 धावांचे योगदान दिले. यात 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. समरविक्रमाच्या या शानदार खेळीमुळे लंकेला 50 षटकांत 9 बाद 257 धावा करता आल्या. तो डावाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला. बांगलादेशकडून तस्किन अहमद व हसन मेहमूद यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. तर शोरिफूल इस्लामने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
संक्षिप्त धावफलक : श्रीलंका 50 षटकांत 9 बाद 257 (निसांका 40, समरविक्रमा 93, कुसल मेंडिस 50, दासुन शनाका 24, तस्कीन अहमद, हसन मेहमुद प्रत्येकी तीन बळी), बांगलादेश 48.1 षटकात सर्व बाद 236 (रिदॉय 82, मेहदी हसन मिराझ 28, रहिम 29, तिक्ष्णा, शनाका आणि पथिरना प्रत्येकी 3 बळी).









