आगा सलमान मालिकावीर, अब्दुल्ला शफीक सामनावीर
वृत्तसंस्था /कोलंबो
पाकिस्तान क्रिकेट संघाने यजमान लंकेचा दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकतर्फी पराभव केला. पाकने ही मालिका 2-0 अशी जिंकली. येथे गुरुवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात खेळाच्या चौथ्या दिवशी पाकने लंकेचा एक डाव आणि 222 धावांनी दणदणीत पराभव केला. पाकच्या अब्दुल्ला शफीकला ‘सामनावीर’ तर आगा सलमानला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाक संघाने लंकेच्या भूमीवर अलीकडच्या कालावधीत कसोटी मालिका विजय मिळवला नव्हता. मात्र यावेळी त्यांना हे ध्येय साध्य करता आले. दोन सामन्यांच्या मालिकेत पाकने लंकेच्या तुलनेत सर्वच विभागात दर्जेदार कामगिरी केली. कोलंबोच्या दुसऱ्या कसोटीत लंकेने पहिल्या डावात 166 धावा जमवल्या. त्यानंतर पाकने पहिला डाव 134 षटकात 5 बाद 576 धावांवर घोषित केला. पाकच्या डावामध्ये सलामीचा अब्दुल्ला शफीकचे द्विशतक तर आगा सलमानचे नाबाद शतक ही वैशिष्ट्यो ठरली. पाकने 5 बाद 463 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांनी आणखी 113 धावांची भर घालून डावाची घोषणा केली. आगा सलमान आणि मोहमद रिझवान यांनी सहाव्या गड्यासाठी अभेद्य 108 धावांची भागीदारी केली. सलमानने 154 चेंडूत 1 षटकार आणि 15 चौकारांसह नाबाद 132 तर मोहमद रिझवानने 67 चेंडुत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 50 धावा झळकवल्या. उपाहाराआधी पाकने पहिल्या डावाची घोषणा केली. लंकेतर्फे असिता फर्नांडोने 3 तर प्रभात जयसुर्याने 2 गडी बाद केले. लंकेला दुसऱ्या डावात केवळ 188 धावापर्यंत मजल मारता आली. नौमन अलीने 70 धावांत 7 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक
लंका प. डाव 48.4 षटकात सर्वबाद 166, पाक प. डाव 134 षटकात 5 बाद 576 डाव घोषित (अब्दुल्ला शफीक 201, शान मसूद 51, आझम 39, सौद शकील 57, सलमान नाबाद 132, रिझवान नाबाद 50, अवांतर 26, असिता फर्नांडो 3-133, प्रभात जयसुर्या 2-194). लंका दु. डाव 67.4 षटकात सर्वबाद 188 (अँजेलो मॅथ्यूज नाबाद 63, करुणारत्ने 41, मधुष्का 33, कुशल मेंडीस 14, डिसिल्वा 10, रमेश मेंडीस 16, अवांतर 5, नौमन अली 7-70, नसीम शहा 3-44).









