लंकेचा पाच गडी राखून मात : सामनावीर समरविक्रमा, निसंकाची शानदार अर्धशतके
वृत्तसंस्था/ लखनौ
आयसीसी वर्ल्डकपमध्ये शनिवारी झालेल्या लढतीत आँरेज आर्मी नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेदरलँडने लंकेला पहिल्यावाहिल्या विजयासाठी चांगलेच झुंजवले. सुरुवातीला प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 91 अशा बिकट स्थितीतून सायब्रँड व व्हॅन बीक यांच्या शानदार खेळीच्या जोरावर नेदरलँडने 50 षटकांत सर्वबाद 262 धावा केल्या. यानंतर लंकन संघाने विजयासाठीचे लक्ष्य 48.2 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. नाबाद 91 धावांची खेळी साकारणाऱ्या समरविक्रमाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

श्रीलंकेचा हा वर्ल्डकपमधील पहिलाच विजय असून त्यांना दोन गुण मिळाले आहेत. गुणतालिकेत ते सध्या नवव्या स्थानावर असून नेदरलँडचा संघ आठव्या स्थानी आहे. विशेष म्हणजे, लिंबू टिंबू असलेल्या नेदरलँडने स्पर्धेत दाखवलेला बाणा नक्कीच कौतुकास्पद आहे. मागील सामन्यात बलाढ्या दक्षिण आफ्रिकेला तगडा हादरा दिल्यानंतर आजही त्यांनी बाजी पलटवत श्रीलंकेविरुद्धही दमदार कामगिरी केली. भलेही त्यांना या सामन्यात विजय मिळवता आलेला नसला तरीही त्यांनी दाखवलेली झुंज नक्कीच कौतुकास्पद होती.
प्रारंभी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नेदरलँडचा डाव 49.4 षटकांत 262 धावांवर आटोपला. एकवेळ त्यांचे 6 फलंदाज 91 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते, मात्र असे असतानाही या जिगरबाज संघाने 262 धावांपर्यंत मजल मारली. सायब्रँड एंजेलब्रेक्ट आणि लोगन व्हॅन बीक यांनी सातव्या गड्यासाठी 130 धावांची भागीदारी करत डच संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. सायब्रँडने 82 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 70 धावा केल्या तर व्हॅन बीकने 75 चेंडूत 1 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 59 धावांचे योगदान दिले. विशेष म्हणजे, आतापर्यंतच्या वर्ल्डकपमध्ये सातव्या विकेटसाठी ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. याशिवाय एकरमनने 32 चेंडूत 29 धावा केल्या. मात्र, नेदरलँडच्या इतर फलंदाजांनी निराशा केली. त्यांच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही. कर्णधार स्कॉट एडवर्डला केवळ 16 धावा करता आल्या. लंकेकडून दिलशान मधूशंका व कसून रजिथा यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले.
पहिल्या विजयासाठी लंकेचा संघर्ष
नेदरलँडने विजयासाठी दिलेल्या 263 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लंकेची सुरुवात खराब झाली. सलामीवीर कुसल परेरा 5 धावा काढून बाद झाला तर कर्णधार कुशल मेंडिसलनेही सपशेल निराशा केली. 11 धावांवर आर्यन दत्तने त्याला बाद करत लंकेला दुसरा धक्का दिला. यानंतर पथून निसंका व समरविक्रमा यांनी तिसऱ्या गडयासाठी अर्धशतकी भागीदारी साकारली. निसंकाने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 9 चौकारासह 52 धावा फटकावल्या. निसंका बाद झाल्यानंतर समरविक्रमाने 102 चेंडूत 7 चौकारासह 93 धावांची शानदार खेळी साकारत संघाच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्याला चरिथा असालंकाने 44 व धनजंय डी सिल्वाने 30 धावा करत चांगली साथ दिली. यामुळे लंकेने हे विजयी आव्हान 48.2 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात पार केले.
संक्षिप्त धावफलक : नेदरलँड 49.4 षटकांत सर्वबाद 262 (सायब्रँड 70, व्हॅन बीक 59, स्काटॅ एडवर्ड 16, एकरमन 29, मधूशंका 49 धावांत 4 तर रजिथा 45 धावांत 4 बळी)
श्रीलंका 48.2 षटकांत 5 बाद 263 (निसंका 54, समरविक्रमा 107 चेंडूत नाबाद 91, कुशल मेंडिस 11, असालंका 44, धनजंय डी सिल्वा 30, आर्यन दत्त 44 धावांत 3 बळी, एकरमन व मीकरन प्रत्येकी एक बळी).









