वृत्तसंस्था /गॅले
फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याच्या शानदार कामगिरीच्या जोरावर गुरुवारी येथे यजमान लंकेने पाकिस्तानचा दुसऱया कसोटीत 246 धावांनी दणदणीत पराभव करत दोन सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडविली. लंकेच्या धनंजय डिसिल्वाला सामनावीर तर प्रभात जयसूर्याला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या शेवटच्या सामन्यात लंकेने पाकिस्तानला निर्णायक विजयासाठी 508 धावांचे कठीण आव्हान दिले होते. पण गुरुवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी जयसूर्याच्या फिरकीसमोर पाकचा दुसरा डाव 261 धावात आटोपला. पाकच्या दुसऱया डावामध्ये कर्णधार बाबर आझमने एकाकी लढत देत 81 धावा जमविल्या. 30 वषीय जयसूर्याने 117 धावात 5 गडी बाद केले. जयसूर्याची ही तिसरी कसोटी असून त्याने आतापर्यंत चौथ्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 5 गडी बाद केले आहेत. रमेश मेंडीसने 101 धावात 4 बळी मिळविले. पाकच्या दुसऱया डावात इमाम उल हकने 4 चौकारांसह 49, बाबर आझमने 1 षटकार 6 चौकारांसह 81, रिझवानने 6 चौकारांसह 37, यासीर शहाने 6 चौकारांसह 27, नसीम शहाने 18 धावा जमविल्या. पाकच्या बाबर आझमचे कसोटीतील हे 23 वे अर्धशतक आहे.
या कसोटीतील खेळाच्या शेवटच्या दिवशी लंकेच्या रमेश मेंडीसने आपल्या पहिल्याच चेंडूवर इमाम उल हकला झेलबाद केले. त्यानंतर जयसूर्याने रिझवानचा त्रिफळा उडविला. फवाद आलम धावचीत झाला. जयसूर्याने आगा सलमानला 4 धावांवर बाद केले. बाबर आझम सहाव्या गडय़ाच्या रूपात बाद झाला. जयसूर्याच्या गोलंदाजीवर तो पायचीत झाला. 77 षटकात पाकचा दुसरा डाव 261 धावात आटोपला. या मालिकेत पाकने गॅलेची पहिली कसोटी जिंकून आघाडी घेतली होती.
संक्षिप्त धावफलक : लंका प. डाव- 378, पाक प. डाव- 231, लंका दु. डाव- 8 बाद 360 (डाव घोषित), पाक दु. डाव- 77 षटकात सर्वबाद 261 (बाबर आझम 81, इमाम उल हक 49, रिझवान 37, यासीर शहा 27, प्रभात जयसूर्या 5-117, रमेश मेंडीस 4-101).