वृत्तसंस्था/ कोलंबो
येथे एसएससी स्टेडियमवर सोमवारपासून यजमान लंका आणि पाकिस्तान यांच्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीला प्रारंभ होत आहे. या मालिकेत पाकने पहिल्या सामन्यात लंकेचा 4 गड्यांनी पराभव करून विजयी सलामी दिल्याने आता यजमान लंकेला मालिका बरोबरीसाठी विजयाची नितांत गरज आहे.
पाक क्रिकेट संघाने गेल्या जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर कसोटीमधील आपला पहिला विजय लंकेमध्ये नोंदवला असल्याने त्यांचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. या दुसऱ्या कसोटीत पाकच्या तुलनेत लंकन संघावर अधिक दडपण राहिल. लंकन संघाचे प्रमुख प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांनी आपल्या संघाचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी कानमंत्र दिले आहे. पाक संघाला ही कसोटी मालिका जिंकण्याची नामी संधी असून ते ही संधी वाया घालवणार नाहीत अशी अपेक्षा आहे.
या मालिकेतील पहिल्या कसोटीत लंकन संघातील धनंजय डिसिल्वाने दोन्ही डावात समाधानकारक कामगिरी केली होती. त्याने पहिल्या डावात शतक तर दुसऱ्या अर्धशतक झळकवले होते पण लंकेच्या इतर फलंदाजांना 30 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. लंकेचा संघ तब्बल पाच वर्षानंतर आता एसएससी मैदानावर पहिली कसोटी खेळत आहे. पाच वर्षापूर्वी या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने लंकेचा 42 धावांनी पराभव केला होता. या मालिकेतील पहिल्या कसोटीत लंकेची फलंदाजी तसेच क्षेत्ररक्षणही दर्जाहीन झाल्याने पाकला हा सामना जिंकता आला होता. दुसऱ्या कसोटीसाठी लंकन संघामध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. खेळपट्टी फिरकीला अनुकुल ठरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला मदत देईल या अंदाजामुळे पाक संघामध्ये आणखी एका वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्याची शक्यता आहे. एसएससीच्या मैदानावर आतापर्यंत झालेल्या 43 कसोटीपैकी 20 कसोटी लंकेने जिंकल्या असून 9 कसोटी गमावल्या आहेत. पाक संघाने या मैदानावर यापूर्वी 6 सामने खेळले असून त्यामध्ये 1 विजय आणि एक पराभव नोंदवला आहे. तर उर्वरित चार सामने अनिर्णित राहिले आहे. या दुसऱ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल. नाणेफेकीनंतर दोन्ही संघ आपले अंतिम 11 खेळाडू निश्चित करतील.









