वृत्तसंस्था/ किंबर्ले
आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटातील पुरूषांच्या क गटातील सामन्यात लंकेने झिंबाब्वेचा डकवर्थ लेव्हिस नियमाच्या आधारे 39 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात लंकेच्या दिनूरा कालुपेना याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात झिंबाब्वेने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. लंकेचा डाव 48.3 षटकात 204 धावांत आटोपला. त्यानंतर पावसाचा अडथळा आल्याने खेळ बराच वेळ थांबविण्यात आला होता. पाऊस थांबल्यानंतर पंचांनी झिंबाब्वेला 22 षटकात विजयासाठी 129 धावांचे नवे उद्दिष्ट दिले. पण लंकेच्या अचूक गोलंदाजीसमोर झिंबाब्वेचा डाव 21.1 षटकात 89 धावात आटोपला.
लंकेच्या डावामध्ये सामनावीर दिनुरा कालुपेनाने 55 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 60, एस. शनमुगातनने 40 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 39, आर. डिस्लिव्हाने 1 षटकार आणि 1 चौकारासह 31, गामागेने 1 चौकारासह 31, आर. परेराने 2 षटकारांसह 12 धावा जमविल्या. लंकेच्या डावात 5 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. झिंबाब्वेतर्फे इकेस्टिनने 40 धावात 3 तर केमुरेओ आणि मॅथ्यू स्कोनकेन यांनी प्रत्येकी 2, कुमारीओ, सिंबी आणि तरव्हेंगा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना झिंबाब्वेचा डाव 21.1 षटकात 89 धावात आटोपला. सलामीच्या हॅलेबेगानाने 1 चौकारासह 10, मॅकमिलनने 1 षटकार आणि 1 चौकारासह 12, रोनक पटेलने 1 चौकारासह 12, कर्णधार मॅथ्यू स्कोनकेनने 1 षटकारासह 19 चेंडूत 27 धावा जमविल्या. लंकेतर्फे एम. त्रिपाठीने 17 धावात 4 तर लाहिरु आणि आर. परेरा यांनी प्रत्येकी 2 तर संकेत आणि डी. कालुपेना यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. झिंबाब्वेच्या डावात 2 षटकार आणि 4 चौकार नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक – लंका 48.3 षटकात सर्व बाद 204 (कालुपेना 60, एस. शनमुगाथन 41, आर. डिस्लिव्हा 31, आर. गामागे 31, आर. परेरा 12, इकेस्टीन 3-40, नेमहुरी 2-50, स्कोनकेन 2-36, कामुरिओ, सिंबी आणि तेरुव्हेंगा प्रत्येकी 1 बळी), झिंबाब्वे (22 षटकात 129 धावांचे उद्दिष्ट) 21.1 षटकात सर्व बाद 89 (हिलेबेंगा 10, मॅकमिलन 12, रोनक पटेल 12, स्कोनकेन 27, अवांतर 10, एम. थेरुपती 4-17, आर. परेरा 2-2, लाहिरु 2-12, संकेत 1-8, कालुपेना 1-25).









