आशिया चषक क्रिकेट : सामनावीर पथिरानाचे 4 बळी, समरविक्रमा, असालंका यांची अर्धशतके
वृत्तसंस्था /कँडी (श्रीलंका)
आशिया कप स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात लंकेने बांगलादेशचा 5 गड्यांनी पराभव करीत विजयी सलामी दिली. 32 धावांत 4 बळी मिळविणाऱ्या मथीशा पथिरानाला सामनावीराचा बहुमान मिळाला. बांगलादेशचा हा वनडेतील सलग अकरावा विजय आहे. प्रारंभी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशचा संघ 42.4 षटकांत 164 धावांत सर्वबाद झाला. नजमुल हुसेन शांतोने सर्वाधिक 122 चेंडूत 89 धावांची खेळी केली. त्याचे शतक थोडक्यात हुकले. श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज मथिशा पथिरानाने 32 धावांत सर्वाधिक 4 बळी घेतले. त्यानंतर लंकेने सदीरा समरविक्रमा व चरिथ असालंका यांच्या अर्धशतकांच्या बळावर 39 षटकांत 5 बाद 165 धावा जमवित सहज विजय साकार केला. असालंकाने 92 चेंडूत 5 चौकार, एक षटकारासह नाबाद 62 तर समरविक्रमाने 77 चेंडूत 6 चौकारांसह 54 धावा जमविल्या. याशिवाय निसांकाने 14, शनाकाने नाबाद 14 धावा जमविल्या.
प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींमुळे युवा खेळाडूंना मैदानात घेऊन उतरलेल्या श्रीलंकेने नाणेफेक गमावल्यानंतरही सामन्यावर पहिल्यापासून पकड मिळवली. सलामीवीर तंजिद हसनला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर कर्णधार शकीब केवळ पाच धावा करू शकला. सलामीवीर मोहम्मद नईमने 16 धावा फटकावल्या. 11 व्या षटकातच बांगलादेशने 36 धावांवर आपल्या महत्त्वाच्या तीन विकेट्स गमावल्या होत्या. इतर फलंदाज केवळ चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही पंधरा-वीस धावांच्या पुढे जाऊ शकले नाहीत. असे असताना नजमुल शांतोने एकहाती किल्ला लढवला. त्याने 122 चेंडूत 7 चौकारासह 89 धावांची शानदार खेळी साकारली. यामुळे बांगलादेशला दीडशेचा टप्पा गाठता आला. नजमुल शतक झळकावण्यास यशस्वी झाला असता, तर हे त्याचे वनडे कारकीर्दीतील दुसरेच शतक ठरले असते. नजमुल 41.3 षटकात थीक्षणाच्या गोलंदाजीवर बाद झाला. तो बाद झाला, तेव्हा बांगलादेश संघाने 8 विकेट्स गमावत 162 धावा केल्या होत्या. यानंतर तळाचे फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे बांगलादेशचा डावही 42.4 षटकांत 164 धावांवर आटोपला. श्रीलंकेकडून मथिशा पथिरानाने 4 बळी घेतले. महिष थीक्षनाने 2 तर धनंजय डी सिल्वा, दुनिथ वेललगे आणि दसुन शनाका यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश 42.4 षटकांत सर्वबाद 164 (मोहम्मद नईम 16, नजमुल हुसेन 89, मुशफिकुर रहीम 13, पथिराना 4, थीक्षना 2 बळी).लंका 39 षटकांत 5 बाद 165 : समरविक्रमा 77 चेंडूत 6 चौकारांसह 54, चरिथ असालंका 92 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह नाबाद 62, दसुन शनाका 21 चेंडूत नाबाद 14, अवांतर 13, शकीब हसन 2-29.
शनिवारचा सामना : भारत वि. पाक, वेळ : दु. 3 पासून, प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क.









