डॉ. नरेंद्र पाठक यांचे प्रतिपादन : गोसासे मंडळातर्फे ब्रह्मराज देसाई स्मृती साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा
सांस्कृतिक प्रतिनिधी/फोंडा
भारतीय भाषांचे सौदर्य अवर्णनीय आहे. सगळ्या देशी भाषा साहित्यविश्वात एकमेकांच्या हातात हात घालून नांदतात मग माणसानीच भाषेचा द्वेष का म्हणून करावा. गोव्यात कोकणी बोलणारे आणि मराठीतून लिहिणारे प्रतिभावन्त पाहिल्यानन्तर भाषा हा वादाचा विषय नसून प्रेम करण्याचा विषय असल्याचे आपणाला जाणवल्याचे प्रतिपादन साहित्य अकादमीचे सदस्य डॉ. नरेंद्र पाठक यांनी केले. गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे गजानन देसाई पुरस्कृत स्व. ब्रह्मराज देसाई स्मृती साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा मंगळवारी मंडळाच्या सभागृहात पार पडला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक डॉ. नरेंद्र पाठक बोलत होते. व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे प्रसिद्ध कादंबरीकार गजानन देसाई, साहित्यिक तथा पत्रकार सुरेश वाळवे, मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर,उपाध्यक्ष विठ्ठल गावस उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. पाठक यांच्या हस्ते मयुरेश वाटवे, राजू भि. नाईक, दुर्गाकुमार नावती, डॉ.गुऊदास नाटेकर, शीतल साळगावकर व ज्ञानेश्वर कोलवेकर (मरणोत्तर) यांना साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मान पत्र व रोख रक्कम असे त्याचे स्वरूप होते. कोलवेकर यांचा पुरस्कार त्यांच्या पत्नीनी स्वीकारला. सुरेश वाळवे यांनी यावेळी मंडळाला वातानुकुलीत सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचे उदघाटन डॉ पथक यांच्याहस्ते झाले. ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. समाज कार्य करण्याची संधी मिळणे यासारखा दुसरा आनंद नसल्याचे ते म्हणाले. अपल्या हातून परोपकार व्हावेत ही इच्छा त्यांनी व्यक्त केली. पुरस्कारप्राप्त साहित्यिकांच्या वतीने राजू भि. नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. गजानन देसाई यांनी आपल्या भाषणात अत्यन्त कठीण परिस्थितीत आपणाला साहित्याने सावरले असे स्पष्ट करून गोव्यात साहित्य पुरस्कारांची संख्या कमी आहे याकडे लक्ष वेधले.कला अकादमी,गोमंतक मराठी अकादमी यांचे पुरस्कार बंद पडलेत याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. आपण लिहीत रहावे अशी आपल्या दिवंगत पुत्राची इच्छा होती असे ते म्हणाले.
लिखाणाचा उद्देश स्पष्ट असावा
अ.भा.मराठी साहित्य संमेलन भरवताना प्रादेशिक भेदभावाला मूठमाती मिळाली पाहिजे. तिथे पक्षपात होता कामा नये. आपल्या लिखाणाचा उद्देश काय, आपल्याला लेखनातून वावहकाना काय द्यायचं आहे याचा विचार साहित्यिकांनी करायला हवा. साहित्यनिर्मितीचा पाया भक्कम असेल तर त्याचा महावृक्ष होऊ शकतो.आज वैचारिक भेसळ, चौर्य वाङ्मय आणि साहित्यातले वाढते प्रदूषण समाजात चिंता बनून राहिली आहे. पुरस्कार देताना लेखननिर्मितीच्या निरामयतेचा आणि सक्षमतेचा कस लागला पाहिजे. लेखन स्वतंत्र आहे याची खात्री कऊन घेतली पाहिजे असे डॉ पाठक म्हणाले.
तीन पुस्तकांचे प्रकाशन
डॉ. नरेंद्र पाठक यांच्या हस्ते गजानन देसाई यांच्या दवबिंदू, डॉ. गुऊदास नाटेकर यांच्या हृदय संवाद व विनोद नाईक यांच्या अनुभूती अशा तीन पुस्तकांचे या सोहळ्यात प्रकाशन करण्यात आले.रमेश वंसकर यांनी स्वागत केले यावेळी संस्थेच्या वतीने डॉ. पाठक यांचा सत्कार केला. हेमंत खांडेपारकर, प्रकाश तळवडेकर,कार्यवाह सुहास बेळेकर व चित्रा क्षीरसागर यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला.कोषाध्यक्ष राजमोहन शेट्यो यांनी सूत्रसंचालन केले तर विठ्ठल गावस यांनी आभार मानले.









