स्टॅलिन आणि अण्णामलाई यांनी एकमेकांविरोधात थोपटले दंड, त्रिभाषा सूत्राचा मुद्दा
वृत्तसंस्था / चेन्नई
तामिळनाडूमध्ये भाषेच्या मुद्द्यावरुन पुन्हा वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्राला विरोध केला असून राज्याच्या द्विभाषा सूत्राचे पुन्हा समर्थन केले आहे. हिंदी भाषेची सक्ती आम्ही कधीही स्वीकारणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले असून तामिळनाडूच्या स्वायत्ततेसाठी संघर्ष करण्याची घोषणा केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या तामिळनाडू शाखेने स्टॅलिन यांच्यावर हेकेखोर धोरण अवलंबत असल्याचा आरोप केला आहे. तामिळनाडू शाखेचे अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी राज्यभर या मुद्द्यावर दौरा करण्याची घोषणा केली असून केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्राचे समर्थन केले आहे. या सूत्राला राज्यातील जनतेचा पाठिंबा मिळविण्यासाठी व्यापक प्रमाणात जनसंपर्क अभियान हाती घेण्यात येणार आहे. स्वाक्षरी अभियानही हाती घेण्यात येणार असून स्टॅलिन यांच्या एकाधिकारशाहीला राज्यातील तामिळ जनता कंटाळली असल्याचे प्रतिपादन अण्णामलाई यांनी केले. संघर्ष करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
स्टॅलिन यांची भूमिका
शनिवारी स्टॅलिन यांचा 72 वा जन्मदिवस चेन्नई येथे साजरा करण्यात आला. यानिमित्त ते आपल्या समर्थकांसमोर आपल्या निवासस्थानी बालत होते. तामिळनाडूच्या हिताचे रक्षण करणे हे आपले एकमेव ध्येय आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. तामिळ भाषेचे हित, तामिळ भाषेची वेगळी ओळख आणि तामिळ संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठीच द्रमुकचा जन्म झाला आहे. केंद्राची मनमानी मानली जाणार नाही, असे त्यांनी या प्रसंगी भाषण करताना स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांना संदेश
तामिळनाडूचे हित या एकाच सूत्रावर काम करण्याचा संदेश स्टॅलिन यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. ‘तामिळनाडू संघर्ष करेल, तामिळनाडू विजयी होईल’, अशी नवी घोषणा त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. हिंदी भाषेला आमचा विरोध कायम राहील. ही भाषा राज्यातील जनता कधीही स्वीकारणार नाही. केंद्र सरकारने सक्ती केल्यास या सक्तीविरोधात आंदोलन केले जाईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अधिकारांसाठी संघर्ष
तामिळ भाषा सर्व तामिळी जनतेसाठी आईसारखी आहे. आम्ही तामिळनाडूच्या अधिकारांसाठी संघर्ष करीत आहोत. तामिळनाडूचा विश्वास स्वायत्ततेवर आहे. 1971 मध्ये ज्या प्रमाणे हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज्यभर आंदोलन करण्यात आले होते, तसेच आंदोलन आवश्यकता भासल्यास पुन्हा केले जाईल. त्यावेळी आपण केवळ 18 वर्षांचे होतो. आज याच तत्वाच्या पाठपुरावा केल्याने आपण राज्याचे मुख्यमंत्री आहोत, याची जाण ठेवावी, अशीही मांडणी त्यांनी केली.
अण्णामलाई यांनीही दिले आव्हान
केंद्राचे त्रिभाषा सूत्र तामिळनाडूतही लागू करण्यासाठी स्टॅलिन यांच्याशी संघर्ष करण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाचे नेते के. अण्णामलाई यांनी व्यक्त केला आहे. 5 मार्चला द्रमुकने या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीवर भारतीय जनता पक्ष बहिष्कार टाकणार आहे, अशी घोषणा अण्णामलाई यांनी शनिवारी केली. त्रिभाषा सूत्राच्या समर्थनार्थ राज्यव्यापी संपर्क अभियान पक्षाच्या माध्यमातून 5 मार्चपासून हाती घेतले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
हिंदीशी संघर्ष जुनाच
तामिळनाडूतील द्रविड पक्षांचा हिंदी भाषा विरोध जुनाच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून तो आजवर चालत आलेला आहे. 1971 मध्ये हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात या पक्षाने मोठे आंदोलन राज्यात केले होते. त्यानंतर त्यावेळच्या केंद्र सरकारला त्रिभाषा सूत्र मागे घ्यावे लागले होते. द्रविडी राजकारण मोठ्या प्रमाणात हिंदी भाषाविरोधावर अवलंबून असल्याने नेहमीच या राज्यात द्रमुककडून हिंदी भाषाविरोधाचा मुद्दा उपस्थित केला जातो. पुन्हा या वादाने डोके वर काढले आहे.
हिंदी विरोधाने काढले डोके वर
ड तामिळनाडूमध्ये केंद्राच्या धोरणाच्या निमित्ताने हिंदी भाषा विरोधाला उजाळा
ड तामिळनाडू भाजपकडून त्रिभाषा सूत्राचे जोरदार समर्थन, संघर्षाच्या पवित्र्यात
ड तामिळनाडूचे हितरक्षण हेच आपले एकमेव ध्येय : स्टॅलिन यांची घोषणा
ड भाजपचे अण्णामलाई आणि स्टॅलिन यांचे एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान









