पालकमंत्री सतीश जारकीहोळी : सीमाभाग मुंबई प्रांतात होता म्हणून मराठीचा प्रभाव
प्रतिनिधी/ बेळगाव
हा भाग यापूर्वी मुंबई प्रांतात होता. येथील व्यवहार मराठीमध्ये चालायचे. त्यामुळे मराठीचा प्रभाव अधिक आहे. लोकशाहीमध्ये कोणावरही हीच भाषा बोला म्हणून भाषेची सक्ती करता येणार नाही, असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगून कन्नड पत्रकारांना घरचा अहेरच दिला. नेहमीच काही पत्रकार मराठी भाषिकांच्या विरोधात काही नेत्यांना प्रश्न विचारत असतात. मात्र सतीश जारकीहोळी यांनी त्यांना योग्य उत्तर दिले. त्यामुळे पत्रकार निरुत्तर झाले.
काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पत्रकारांनी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक मराठीतच बोलतात. जाणून बुजून कन्नड बोलणे टाळतात. असा आरोप केला. त्यावर उत्तर देताना पालकमंत्र्यांनी उपरोक्त उत्तर दिले. लोकशाहीमध्ये कोणालाही हीच भाषा बोला म्हणून सक्ती करता येणार नाही. महानगरपालिकेचे सर्व व्यवहार कागदोपत्री कन्नडच होतात. त्यामुळे कोणाच्या बोली भाषेवर दबाव घालता येणार नाही. कन्नड भाषेमध्ये बोलते करण्यासाठी त्या प्रकारचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. त्यांनी स्वत: हून स्वयंप्रेरणेतून कन्नड बोलले पाहिजे. तरच ते शक्य आहे, असे सांगून कन्नड पत्रकारांना चोख उत्तर दिले.









