24 तासात 33 जणांचा मृत्यू : शिमल्यात दरड कोसळल्याने शिव मंदिराला तडाखा, बचावकार्य सुरूच
वृत्तसंस्था /शिमला
हिमाचल प्रदेशात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासात भूस्खलन, ढगफुटी आणि पावसाच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये 33 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. शिमला येथे भूस्खलनाच्या दोन मोठ्या घटना घडल्या असून समरहिल भागात एक शिवमंदिर कोसळले. तर फागली भागात अनेक घरे माती आणि डोंगराखाली गाडली गेली. या दुर्घटनांमध्ये आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अजूनही अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. दुसरीकडे सोलनमध्ये ढगफुटीमुळे 16 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. 16 ऑगस्टपर्यंत राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे येथील शिवमंदिर भूस्खलनाच्या तडाख्यात आले. अधिक श्रावण महिन्यातील सोमवार असल्याने मंदिरात मोठ्या संख्येने लोक मंदिरात पोहोचले होते. याचदरम्यान झालेल्या पडझडीमध्ये 40 हून अधिक लोक गाडल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी येथे मदत आणि बचावकार्य सुरू आहे. ही घटना शिमल्याच्या समरहिल भागात घडली. ढिगाऱ्यातून आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दुसरीकडे, शिमल्याच्या लाल कोठीमध्ये भूस्खलनामुळे काही लोक गाडले जाण्याची शक्मयता आहे. हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी ट्विट करून या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
हिमाचल प्रदेशात सततच्या मुसळधार पावसाने कहर केला आहे. राज्यात ठिकठिकाणी ढगफुटी आणि भूस्खलनामुळे 33 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. सततच्या पावसामुळे मंदिरात बचावकार्यात अडचणी येत आहेत. डोंगरावरून अजूनही दगड पडत आहेत. मंदिराच्या छतावर मातीच्या ढिगाऱ्यासह चार ते पाच झाडे उन्मळून पडली. यात मंदिराचे प्रचंड नुकसान झाले आहे. एसडीआरएफ, आयटीबीपी, पोलीस आणि स्थानिक लोक बचावकार्यात गुंतले आहेत. जेसीबी मशिनने ढिगारा उपसण्याचे काम केले जात आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही सुमारे 30 जण दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिमला, सोलन, कांगडा येथे प्रत्येकी एका ठिकाणी आणि मंडीमध्ये दोन ठिकाणी ढगफुटी झाली. शिमल्यात 15, मंडीत आठ आणि सिरमौरमध्ये एक बेपत्ता आहे. अन्यत्रही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जीवितहानी झाल्याचा दावा केला जात आहे. स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरनुसार, राज्यात 751 रस्ते बंद आहेत. याशिवाय 4,697 वीज ट्रान्सफॉर्मर आणि 902 पाणीपुरवठा योजना बंद आहेत. मंडी जिल्ह्यातील सर्वाधिक 345 रस्ते, शिमल्यात 115 आणि हमीरपूरमधील 124 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. मंडी जिल्ह्यात 2672 आणि शिमल्यात 348 इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर बंद पडले आहेत. या पावसाळ्यात 24 जून ते 13 ऑगस्टपर्यंत राज्यात 257 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 290 जण जखमी झाले आहेत. आतापर्यंत 1,376 घरे कोसळली आहेत. 7,935 घरांचे नुकसान झाले आहे. तसेच 270 दुकाने आणि 2727 गोशाळांचेही नुकसान झाले आहे. पावसाळ्यात आतापर्यंत 7,020.28 कोटी ऊपयांहून अधिक नुकसान झाले आहे. राज्यात भूस्खलनाच्या 90 घटना आणि अचानक पुराच्या 90 घटना समोर आल्या आहेत.

स्वातंत्र्यदिनी सांस्कृतिक कार्यक्रम रद्द
हिमाचल प्रदेशमध्ये अतिवृष्टीमुळे परिस्थिती बिकट झाली आहे. राज्यातील गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम न करण्याची घोषणा केली आहे. केवळ ध्वजारोहण करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिमाचलमध्ये एप्रिल महिन्यापासून पावसाला सुरुवात झाल्यामुळे जमिनीत ओलावा वाढला आहे. अशा परिस्थितीत मोठा पाऊस होताच नुकसान होत असल्यामुळे नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ झाल्याने राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे.









