मोठमोठे दगड कोसळल्याने घाटमार्ग बंद
वृत्तसंस्था /किन्नौर
हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिह्यातील निगुलसारी येथे पुन्हा एकदा भूस्खलनाची घटना घडली आहे. या घटनेत टेकडीवरून मोठमोठे दगड चालत्या वाहनांवर कोसळल्याने बराच गोंधळ उडाला. मोठमोठे दगड पडल्याने ट्रक व पिकअप वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे. राज्यात सध्या पाऊस कोसळत असल्यामुळे घाटमाथ्यावरून भूस्खलन झाल्याचे सांगण्यात आले. भूस्खलनाची ही घटना गुऊवारी सकाळी घडली. किन्नौर जिह्यातील निगुलसारीजवळील टेकडीवरून दगडांचा वर्षाव झाला आहे. यावेळी ट्रक आणि पिकअप वाहनावर भलेमोठे दगड कोसळले. पिकअपमध्ये भरलेल्या सफरचंदांचे ट्रे रस्त्यावर विखुरले होते. दरड कोसळण्यापूर्वीच प्रवासी आणि चालक वाहनातून बाहेर पडल्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. सध्या महामार्ग पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आहे. भूस्खलनाचा व्हिडिओही समोर आला आहे. रस्त्यावर वाहनांची रांग लागली असून मोठ्या संख्येने लोक घटनास्थळी उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.









