खेड :
मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडी बोगद्यापासूनच्या मार्गावर दरडींसह दगड कोसळत असल्याने वाहनचालकांचा जीव टांगणीवर आहे. यामुळे वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली असून महामार्गावरील प्रवासात नव्या समस्येची भर पडली आहे. पहिल्याच धुवाँधार पावसात दरडी व दगड मार्गावर कोसळू लागल्याने वाहतुकीत प्रचंड अडसर निर्माण झाला आहे.
कशेडीचे दोन्ही बोगदे ऐनकेन कारणाने चर्चेत राहिले आहेत. या दोन्ही बोगद्यातून सध्यास्थितीत पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू झाल्याने प्रवाशांचा प्रवास वेगवान अन् आरामदायी झाला आहे. या सुस्साट प्रवासात आता बोगद्यापासून काही अंतरावर असलेल्या मार्गावर कोसळणाऱ्या दरडी व दगडांचा अडथळा उभा ठाकला आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. सोमवारी दिवसभर पावसाने थैमान घातले.
धो-धो कोसळणाऱ्या या पावसामुळे महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांचा वेगही मंदावला आहे. त्यात सोमवारी रात्रीपासून मार्गावर दरड व दगड कोसळत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. या मार्गालगत असणाऱ्या दरडींसह दगड कोसळू नयेत, यादृष्टीने राष्ट्रीय महामार्ग खात्याने अजूनही ठोस उपाययोजनांचा अवलंब केलेला नाही. यामुळे वाहनचालकांची कसरत सुरू आहे. महामार्गावरून वाहने हाकताना वाहनचालकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी यांनी केले आहे.








